नसरापूर: नवसह्याद्री गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. या वर्षीच्या स्नेहसंमेलनाची संकल्पना ‘उधाण’ होती. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि जल्लोष भरून टाकणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगतदार झाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून वनसंरक्षक उपसंचालक श्रीमती नीता कट्टे उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी पी.एन. सुके होते. संस्थेचे ग्रुप डायरेक्टर सागर सुके, सायली सुके, सुरज सुके, तसेच गुरुकुलच्या डायरेक्टर सानवी सुके यांची उपस्थितीही कार्यक्रमाला विशेष लाभदायक ठरली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुण्या नीता कट्टे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देत त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे महत्त्व पटवून दिले. त्या म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी शाळेत आयोजित विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत सर्वांगीण विकास साधावा. पालकांनीही मुलांना खेळ, प्रकल्प, आणि स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन द्यावे.”
‘उधाण’ या संकल्पनेखाली विद्यार्थ्यांनी हिंदी, मराठी, आणि इंग्रजी भाषांतील नृत्याविष्कार सादर करत प्रेक्षकांचे मन जिंकले. जुनी-नवी गाणी, देशभक्तिपर गीतांवरील नृत्ये आणि उडत्या चालींवर सादर झालेल्या आकर्षक प्रस्तुतींना पालक आणि माजी विद्यार्थ्यांनी भरभरून दाद दिली.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या नवसह्याद्री गुरुकुलने नेहमीप्रमाणे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान दिले आहे. यंदाच्या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका वर्षा धुमाळ आणि त्यांच्या टीमने उत्कृष्टरीत्या केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका वर्षा धुमाळ यांनी पाहुणे, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षकांचे आभार मानले. त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.