भोर, प्रतिनिधी : भोर शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही वर्षांपूर्वी नागरिकांना अखंडित पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप शहरातील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळालेला नसल्याने हे आश्वासन पूर्ण होणार की पुन्हा एकदा केवळ आश्वासनच राहणार, याबाबत शहरात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
दरम्यान, आमदार शंकर मांडेकर यांनी भोर शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने भाटघर धरण परिसराची पाहणी केली. या पाहणीदरम्यान भविष्यातील पाणीपुरवठा योजना, उपलब्ध जलसाठा आणि शहरासाठी आवश्यक असलेल्या पाणी व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. त्यामुळे २४ तास पाणीपुरवठा योजनेला प्रत्यक्षात गती मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी जिल्हा परिषद सभापती अमोलभाऊ नलावडे, जिल्हा परिषद सदस्य विक्रमदादा खुटवड, पंचायत समिती सदस्या तृप्तीताई खुटवड, किरण राऊत, नगरसेवक कुणाल धुमाळ, अतुल काकडे तसेच जितेंद्र खोपडे उपस्थित होते. यावेळी शहरासाठी प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
भोर शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. उन्हाळ्यात अनेक भागांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत २४ तास पाणीपुरवठा ही योजना नागरिकांसाठी दिलासादायक ठरू शकते. मात्र यासाठी आवश्यक निधी, तांत्रिक बाबी, जलवाहिन्यांचे जाळे आणि पाणी साठवण क्षमता यांसारख्या अनेक गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर या हालचालींना राजकीय रंगही दिला जात आहे. काही नागरिकांच्या मते, निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. तर काहींना हे केवळ निवडणूकपूर्व हालचाली असल्याचे वाटत आहे.
भाटघर धरणाच्या पाहणीनंतर मात्र शहरात आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्ष कामांना सुरुवात होऊन नागरिकांना २४ तास पाणीपुरवठ्याचा लाभ मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता हे आश्वासन प्रत्यक्षात उतरते की पुन्हा एकदा केवळ चर्चेपुरतेच मर्यादित राहते, हे येणारा काळच ठरवणार आहे.










