भोरः तालुक्यातील महत्वाची समजल्या जाणाऱ्या नऱ्हे गावच्या सरपंचपदी किशोर भगवान गोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड होताच गोळे यांच्या समर्थकांनी गुलाल उधळीत फटाके वाजवत त्यांचा विजयोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला.
नऱ्हे ग्रामपंचायतीचे सरपंच हनुमंत वीर यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला असल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी गुरुवारी ग्रामपंचायत नऱ्हे कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी किशोर गोळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकार यांनी किशोर गोळे यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
यावेळी ग्रामपंचायत नऱ्हेचे ग्रामसेवक, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंचपदी निवड जाहीर झाल्यानंतर गावकऱ्यांनी व तरुणांनी किशोर गोळे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच किशोर गोळे यांनी दिली.