भोर : पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व, माजी मंत्री, काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत शिलेदार आणि भोर-वेल्हा-मुळशीच्या विकासाचे शिल्पकार अनंतराव थोपटे यांच्यावर शुक्रवारी भोर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र पोलिस दलाकडून बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. हजारो नागरिक, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत थोपटे साहेबांना अश्रुपूर्ण निरोप देण्यात आला.
भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या अंत्यविधीवेळी वातावरण शोकमग्न झाले होते. विठ्ठल नामाच्या गजरात, “अनंतराव थोपटे अमर राहो”च्या घोषणांमध्ये आणि भावनिक वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भोर शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बाजारपेठ बंद ठेवून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी आमदार शंकर मांडेकर यांनी श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले की, “भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यांच्या विकासासाठी आयुष्यभर झटणारे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले आहे. थोपटे साहेब हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे मार्गदर्शक होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्याने एक ज्येष्ठ आधारवड गमावला आहे.”
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, “अनंतराव थोपटे यांचे संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी समर्पित होते. संयम, शिस्त आणि विकासाची दृष्टी यांचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांचे कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील.”
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले, “अनंतराव थोपटे हे पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील भीष्मपितामह होते. सर्व पक्षांतील नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी विकास आणि लोकहित यालाच नेहमी प्राधान्य दिले. त्यांच्या निधनाने सार्वजनिक जीवनातील एक मोठे पर्व संपले आहे.”
यावेळी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खडकवासला आमदार भीमराव तापकीर, दौंडचे आमदार राहुल कुल, पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप, शिरूरचे माजी आमदार अशोक पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, भोर पोलीस निरीक्षक अण्णा पवार, राजगड पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, राजगड साखर कारखाना, खरेदी-विक्री संघ, दूध संस्था तसेच विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहकार, शिक्षण, ग्रामीण विकास, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात अनंतराव थोपटे यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहणार आहे. भोर-वेल्हा-मुळशीच्या दुर्गम भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणारा हा लोकनेता आज अनंतात विलीन झाला असला तरी त्यांच्या कार्याचा ठसा जनतेच्या मनावर कायम राहणार आहे.










