पुणे: बदलापुरातील प्रकरणानंतर राज्यातील इतर भागांमधून देखील लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे शालेय मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. पुण्यातून शाळकरी मुलीची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्कूल व्हॅन चालक विद्यार्थिनीला त्रास देत होता. वडिलांच्या वयाचा असलेला हा चालक तिला घाणेरडे मेसेजेस करीत होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका शाळेतील स्कूल व्हॅन चालकाने शालेय विद्यार्थिनीला ‘तू मला आवडतेस’ असे मेसेजेस केले होते. प्रत्यक्षात आणि इन्स्टाग्रामवर तो सतत मेसेज करून तिला त्रास देत होता. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी व्हॅन चालकाला ताब्यात घेतले असून, चालकावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्कूल व्हॅन चालकाला मनसेच्या गणेश भोकरे यांनीही चांगलाच चोप दिला आहे. तसेच मनसैनिकानी संबंधित स्कूल बस चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
बदलापूरची घटना ताजी असतानाच विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यातून देखील मुलींना छेडण्याचे प्रकार समोर येत असल्याने यावर कडक कारवाई करावी जेणेकडून अशा घटना वारंवार घडणार नाहीत अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.