पुणेः वारजे पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या गुन्ह्याची नोंद असलेल्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने तीन महिन्यांचा कारवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, आरोपी राजु पंढरीनाथ दुसाने (वय ४३ वर्षे, रा. महालगाव ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर) याने येरवडा कारागृहातून फेब्रुवारी २०२४ रोजी पलायन केले होते. भारत बंदच्या दि. २१/०६/२०२४ दिवशी पोलीस बंदोबस्तामध्ये असलेल्या एका महिला पोलीसाने एक संशियतरित्या आढळून आल्याने इसमाकडे चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. यावरुन अधिक माहिती घेतली असता, सदर व्यक्ती हा राजु पंढरीनाथ दुसाने असल्याचे निषन्न झाले. आरोपीची वैदयकीय तपासणी करुन त्यास सुरक्षित येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आधी उडवाउडवीची उत्तरे, नंतर सांगितली खरी ओळख
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.२१/०६/२०२४ रोजी भारत बंदच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने वरिष्ठांचे आदेशाने महिला पोलीस अंमलदार वेदपाठक, लोणकर, डोळसे हे शिवनेरी रोड ते वखार महामंडळ रोड अशी पायी पेट्रोलिंग करीत असताना मार्केटयार्ड गेट नं. १ जवळील रिक्षा जवळ एक इसम संशयीतरित्या उभा असलेला दिसून आला. त्यावेळी महिला पोलीस अंमलदार वेदपाठक यांनी त्यांचे मोबाईलवरील व्हॉटसअपवर प्राप्त झालेल्या फोटोमधील मिळत्या जुळत्या वर्णनाचा इसम दिसून आला. त्यावेळी त्याच्या जवळ जाऊन त्याचे नाव, गाव व पत्ता विचारले असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तसेच पोलीसांना घाबरुन पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. त्यावेळी त्यांनी सोबत असलेला स्टाफसह थोड्याच अंतरावर जावून त्यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशन येथे आणले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली. त्यावेळी त्याने त्याचे नाव राजु पंढरीनाथ दुसाने असे सांगितले.
सदरच्या बातमीची खात्री करण्याकरीता येरवडा पोलीस स्टेशन येथे फोन करुन माहिती घेतली असता, त्याच्या विरुध्द येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे व तो वारजे पोलीस स्टेशनमध्ये आरोपी राजु पंढरीनाथ दुसाने, वय ४३ वर्षे, रा मु. पो. महालगाव ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर माहिती मिळाली. आरोपीची वैदयकीय तपासणी करुन त्यास सुरक्षित येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त, पुणे शहर प्रविणकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ०५ पुणे, आर. राजा, सहा पोलीस आयुक्त, वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे यांच्या आदेशाने महिला पोलीस अंमलदार वेदपाठक, लोणकर, डोळसे यांनी केली.