संगमनेर: गेल्या काही दिवसांपूर्वी येथील भाटघर धरणाशेजारी असलेल्या संगमनेर माळवाडी ग्रामपंचायतीच्या ५ सदस्यांनी मनमानी कारभार होत असल्याचा आरोप करीत आपल्या पदाचे राजनामे दिली होते. सदर राजनामे हे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच यांच्या मनमानी कारभार होत असल्याचा आरोप करीत देण्यात आले होते. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण ९ सदस्य असून, त्यापैकी ५ सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या ५ सदस्यांपैकी ४ सदस्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले असून, एका सदस्याने आपला राजीनामा मागे घेतल्याने सत्ता कायम राखण्यात सत्ताधारी यशस्वी झाले आहेत.
या प्रकरणी ग्रामपंचायतीची मासिक सभा घेण्यात आली. या बैठकीत राजीनामे दिलेल्या ५ सदस्यांपैकी ४ सदस्यांचे राजीनामे पात्र ठरविण्यात आले आहेत. तर सदस्य अनिल पवार यांनी मतदारांचा आदर राखत आपला राजीनामा मागे घेतला. नऊ पैकी पाच सदस्यांमुळे बहुमत सिद्ध झाले असून, सरपंच सायली महेंद्र साळुंके, उपसरपंच प्रमोद दशरथ बांदल, सदस्य शर्मिला संतोष लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य लता सुरेश खामकर, आणि अनिल भगवान पवार यांचा समावेश यामध्ये आहे.
गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत गावात सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अनेक विकास कामे मार्गी लावली. एक महिला आणि गावची प्रथम नागरीक म्हणून भूमिका बजावत असताना नाहक आरोप आणि विकास कामांच्या आड येण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. परंतु उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मंडळी ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्यामुळेच मी यापुढील काळात देखील विकास कामे अशाच पद्धतीने चालू ठेवणार आहे.
-सायली महेंद्र साळुंके (सरपंच संगमनेर)