भोरः येथील कुसगावमध्ये दि. १६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अनिता रमेश हुंबे (वय ३२ वर्षे व्यवसाय गृहिणी व शेती रा.कुसगाव ता.भोर जि.पुणे) यांच्या घराच्या बाजूला असणाऱ्या जागेच्या व रस्त्याच्या कारणावरून गर्दी जमवून त्यांच्या घरात अनाधिकाराने प्रवेश करून त्यांना तसेच सासू आणि मुलींना शिवीगाळ दमदाटी करून हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच जमावातील विष्णू व कृष्णा याने काठीने मारहाण केली. त्यानंतर त्यामधील कोणीतरी हातात दगड घेऊन सुद्धा त्यांना तसेच सासु सोनाबाई यांना मारहाण करून आपखुशीने दुखापत केली आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन राजगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत फिर्यादी यांच्या कुटुंबातील व्यक्तींना लाकडी काठी व दगडाचा वापर करुन मारहाण करण्यात आली असून, या प्रकरणी आरोपी कृष्णा रामभाऊ गोरे, विष्णू रामभाऊ गोरे, भानुदास बाबुराव गोरे, गिताबाई ज्ञानेश्वर गोरे, बाळू गोरे, ज्ञानेश्वर गोरे, रखमा गोरे, भानुबाई विष्णू गोरे, सुनीता कृष्णा गोरे, मथुबाई रामभाऊ गोरे सर्व राहणार कुसगाव ता. भोर जि. पुणे यांच्याविरुद्ध राजगड पोलिसांत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच पुढील तपास पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आडवाल हे करीत आहेत.