भोरः राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून शंकर मांडेकर यांचे नाव जाहीर होताच शिवसेना शिंदे पक्षातील कुलदीप कोंडे यांनी नाराजी व्यक्त केली. भोरची जागा ही शिवसेना शिंदे गटाला सुटणार असे स्वःताह एका जाहीर सभेत कोंडेंनी सांगितले होते. मात्र, ही जागा युतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला गेल्याने नाराज झालेल्या कुलदीप कोंडे यांनी अपक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याचा निश्चिय करीत आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता इथले राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघालेले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दिलेल्या शब्द पाळण्यात आला नसल्याची खंत कुलदीप कोंडे यांनी बोलून दाखवली.
मी शिवसेनेचा कार्यकर्ता असून, चार निवडणुकी लढविलेल्या आहेत. ज्यावेळी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला त्यावेळी महायुतीमधील तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांनी मला शब्द दिला होता. सदर जागा ही शिवसेनेला सोडली जाईल. कालपर्यंत ही जागा शिवसेनेला सोडली जाणार हे निश्चितच होते. मात्र ऐनवेळी वेगळेच घडले असल्याचे कोंडे यांनी सांगितले. तसेच ही जागा सोडताना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. वरिष्ठांनी ऐकलं नाही म्हणून हा निर्णय घ्यावा लागल्याचे स्पष्टीकरीण कोंडे यांनी दिले. ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे ते यावेळी म्हणाले.