भोर : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने तसेच सुसाट्याचा वारा यांमुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडत आहेत. महावितरणाच्या भोर ग्रामीण २२ केव्ही फिडरवर बिघाड झाल्याने सोमवार पहाटेपासून येथील वडगाव डाळ, उत्रौली, वेनवडी, पोंबर्डी, शिरवली, वाठार, पिसावरे, नांदवाव गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सदर वीज पुरवठा हा नीरा नदीतील वीज वाहिनीवर बांबू पडल्याने खंडित झाला होता. आपल्या जीवाची पर्वा न करता नदीतून पोहून जात बांबू काढल्याने वीज पुरवठा सुरळीत झाला. बंडू डोंगरे असे महाविरतणाच्या मदतीला धावून जाणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
बिघाड शोधण्यात यश
महावितरणाकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात होते. वीज कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाचा अडथळा येत असल्याने बिघाड नेमका कशामुळे होत आहे, याचे कारण सापडत नव्हते. अशा परिस्थितीतही महावितरणाचे कर्मचारी नागेश बांदल, नितीन तारू, संदीप प्रचंड व अक्षय शेटे यांनी बिघाड शोधून काढला.
पाण्याच्या प्रवाहामुळे कामात अडथळा
भाटघर पॉवर हाऊस शेजारी नीरा नदीत असलेल्या वीज वाहिनीवर काटेरी बांबू पडले होते. तसेच भाटघर धरण क्षेत्रात दोन दिवसांत पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे विद्युत गृह व सांडव्यातमधून ११ हजार ४३१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत होता. इतक्या मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने वीज वाहिनीवर पडलेल्या बांबूचे ठिकाण पाण्याच्या प्रवाहात प्रवाहित होत होते.
‘तो’ देवासारखा मदतीला धावून आला
पाण्याच्या प्रवाहाचा वेग अधिक असल्याने वीज कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी जाता येत नव्हते. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता अरविंद अंभोरे यांना या विषयी माहिती दिली. त्यानंतर अभियंता अंभोरे व सेवा निवृत्त वीज कर्मचारी केशव बांदल यांनी बिघाडस्थळी जाऊन पाहणी केली. वीज वाहिनीवर बाबू पडलेले ठिकाण धरणातून सोडलेल्या पाण्यात असल्याने तेथे जाणे अवघड होते. याचवेळी संगमनेर येथील पोहण्यात तरबेज असलेला तरुण श्रीकांत ऊर्फ बंडू डोंगरे महावितरणाच्या मदतीला देवासारखा धावून आला.
मोठ्या अडथळांचा सामना करीत पुन्हा वीज पुरवठा झाला सुरळीत
अंभोरे व बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली त्या वाहिनीमधून जाणारा वीज प्रवाह बंद करण्यात आला. बंडू डोंगरे या तरुणाने कमरेला कोयता बांधून पाण्यात पोहत जाऊन वीजेच्या वाहिनेवर पडलेल्या बांबू बेटा शेजारी असणाऱ्या झाडाच्या खोडाचा आसरा घेत तोडण्याचा प्रयत्न केला. त्यात पाण्याची खोली जास्त व वाहत्या पाण्याच्या वेग जास्त असल्याने या कामात मोठा अडथळा निर्माण होत होता. अशाही परिस्थितीत डोंगरे हा मागे हटला नाही. तासाभराच्या प्रयत्नानंतर वीजेच्या वाहिनीवर पडलेले बांबू तोडण्यात त्याला यश आले. त्यानंतर तो पोहून बाहेर आला. यावेळी त्याने दाखविलेल्या धाडसाचे अंभोरे, बांदल, वीज कर्मचारी तसेच रवी जांभळे, प्रदीप बांदल यांनी कौतुक केले. त्यानंतर वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला. धाडसी बंडू डोंगरे या तरुणासह भरपावसात आपले कर्तव्य बजावणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.