खेड शिवापूर : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या खेड शिवापूर येथील पीर कमरअली दुर्वेश बाबांच्या दर्ग्यावर रोजा इफ्तारीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्व धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपुलकीचा आणि एकतेचा संदेश दिला. मुस्लिम बांधवांनी उपवास सोडताना फळांचा उपहार स्वीकारला व सामूहिकपणे इफ्तार साधला.
कार्यक्रमास शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शिवभूमी शिक्षण संस्थेचे सचिव संग्राम कोंडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेश सरचिटणीस अभयसिंह कोंडे, वि. वि. का. सोसायटीचे माजी अध्यक्ष नाना धोंडे, राजगडचे पोलिस निरीक्षक गवळी आर., भगीरथ घुले, दर्गा ट्रस्टचे फिरोज मुजावर, शफिक तांबोळी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
या इफ्तार पार्टीमध्ये खजूर, विविध फळे, ज्यूस आदींनी उपवास सोडण्यात आला. विशेष म्हणजे, या प्रसंगी केवळ मुस्लिम बांधवच नव्हे, तर इतर धर्मीय नागरिकांनाही फळ व खजूरांचे वाटप करण्यात आले. यानंतर सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेत, आपुलकी आणि सलोख्याचे दर्शन घडवले.
पीर कमरअली दुर्वेश दर्गा ट्रस्ट, मुजावर बंधू व समस्त खेड शिवापूर ग्रामस्थ यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व धर्मीय नागरिकांना आमंत्रण देऊन समाजात एकोप्याचे बंध अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवत खेड शिवापूर येथील इफ्तार पार्टीने सर्वत्र सामाजिक सलोख्याचा आदर्श घालून दिला. ग्रामस्थांच्या सहभागामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी व अर्थपूर्ण ठरला.