खंडाळा ( निलेश गायकवाड ) – तुतारीचा स्वर… डफ कडाडला अन् सनईचा सुरु घुमला…. तर श्रावणातील ऊन सावल्यांच्या खेळात शिव्यांची लाखोली वाहत सुमारे अर्धा तास पारंपारिक ‘ बोरीचा – बार ‘ रंगला. दरम्यान या निमित्ताने माळावर यात्रेचे स्वरूप आले होते.
खंडाळा ते लोणंद जाणाऱ्या रस्त्यावर बोरी गावानजीक दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या बोरीच्या बाराची उत्सुकता नागरिकांना होती. नागपंचमीच्या दुसऱ्या साजरा केला जाणार बोरीचा बार साजरा करण्यासाठी सुखेड व बोरी या दोन्ही गावातील शेकडो महिला वाजतगाजत गावच्या वेशीवरील सरहद्देच्या ओढ्यावर दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास जमल्या.तुतारीचा आवाज घुमला. आणि डफाचा आवाज कडाडला. तसा ओढ्याच्या दोन्ही किनाऱ्यावरून महिलांनी एकमेकींना हातवारे करुन शिव्यांची लाखोली वाहण्यास सुरुवात झाली.दरम्यान, श्रावणातील ऊन सावल्यांचा खेळ दिसून आला. तर ओढे -नाले वाहत होते.त्यामुळे दोन्ही गावातील माहिला काही वेळानी ओढ्याच्या पात्रात उतरल्या,त्यामुळे महिला पोलिसांची दमछाक झाली.तर सुमारे अर्धातास एकमेकींना शिव्या देऊन वाद घालून हातवारे करुन हा अनोखा उत्सव साजरा करण्यात आला.खंडाळा तालुक्यातील नागरीकांसह जिल्हयातील आबाल- वृद्धांनी हा उत्सव पाहण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती.
त्यांनतर दोन्ही गावातील महिला गावात आल्या व ग्रामदैवताच्या समोर मोकळ्या मैदानात फेर धरित, फुगडया खेळत पंचमी साजरी केली. तर बोरीचा बारा निमित्त येथील मिठाईची दुकाने व पाळणे लावण्यात आले होते.त्यामुळे माळावर यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.यावेळी लोणंद पोलिसांकडून बंदोबस्त ठेवला होता .