पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे
शहरातील सिंहगड रस्त्याची वाहतूक कोंडी सुटावी म्हणून; सिंहगड रस्त्याला पूल प्रस्तावित करण्यात आला होता. या पूलाचे काम करण्याचे ठरले त्यापैकी पूलाच्या एका भागातील काम पूर्ण झाले आहे, असे असून देखील सदर पूल हा नागरिकांसाठी खुला करण्यात आला नव्हता. यामुळे नागरिकांना मोठा मनस्तापाचा सामना करावा लागत होता. तसेच या प्रकरणी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी ७ वाजता पूलाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पवार म्हणाले की, १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नागरिकांच्या सुविधांचे लोकार्पण होत आहे, ही खरोखरंच नव्या समृद्धीची पहाट असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाने उघडीप दिल्यामुळे सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौकातील उड्डाणपुलावर डांबराचा शेवटचा थर देण्यात आला. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. तरीही उदघाटन होत नसल्यामुळे टिकेची झोड उठत होती. अखेर या उड्डाणपुलाच्या उदघाटनाचा मुहूर्त ठरला आणि आज सकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पूलाचे उद्घाटन झाले. या उड्डाणपुलामुळे सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे. या उद्घाटनप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ,
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, खासदार मेधा कुलकर्णी आदी उपस्थित होते.