भोर: महाड-पंढरपुर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले असून, रस्त्याच्या हद्दीत येणाऱ्या पुरातन वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात येत आहे. यामुळे ज्या वृक्षांची तोड करण्यात आली आहे, त्या वृक्षांच्या झाडाची लागवड करण्यात यावी, अशी मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे.
महाड-पंढरपुर या राष्ट्रीय महामार्गचे काम वरंधा घाट ते शिंदेवाडी फाटा रस्त्याच्या कामासाठी सुमारे ७२३ कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. पंढरपुर ते शिंदेवाडीपर्यंत रस्त्याचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. परंतु, शिंदेवाडी, विंग, राजेवाडी, वडगाव डाळ, उत्राेली, भोर, वेनवडी, आंबेघर, वाठार हिमा, आपटी निगुडघर, वेणूपुरी, कोंढरी, वारवंड, शिरगाव, वरंधा घाटापर्यंत रस्त्यावर मोठी वृक्ष आहेत. मात्र, या पुरातन वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होताना दिसत असल्यामुळे रस्त्यावरून नेहमी ये-जा करणाऱ्या नागरिकांना सावली देणाऱ्या वृक्षांची तोड होत असल्याने मनाला वेदना होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शिंदेवाडी-भोर-वरंधा घाटापर्यंत रस्त्याच्या कडेने पुरातन काळात वड, पिंपळ, आंबा या झाडांची लागवड झाली असताना ही झाडे जवळजवळ २०० ते ३०० वर्षांपूर्वींची झाडे आहेत. या वृक्षांच्या सावलीचा अनेक पिढींनी आस्वाद घेतला आहे. तसेच उन्हाळ्यात अनेकांनी या वृक्षाच्या झाडाखाली व्यवसाय सुरु केले होते. त्यामुळे हे दिवस पुन्हा येणार नसल्यामुळे व्यवसायिकांच्या मनाला वेदना होत आहेत. ठेकेदार त्या वृक्षांची तोड करत असताना नागरिकांच्या जून्या आठवणी जाग्या होऊ लागल्या आहेत. ज्या वृक्षांची तोड केली जात आहे, त्या वृक्षांची लागवड रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर करावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वृक्षप्रेमींनी केली आहे.
पुरातन वृक्षांची तोड होत असल्यामुळे निसर्ग सौंदर्य लोप पावू लागले आहे. तसेच वृक्ष नसल्यामुळे आश्रय घेण्याचे थांबले जाणार आहे. तालुक्यातील वनराई नष्ट होत चालली आहे. परंतु नुकत्याच झालेल्या कापुरव्होळ, मांढरदेवी रस्त्याचे रुंदीकरण करतेवेळी पुरातन वृक्षांची मोठी तोड झाली. मात्र, ज्या वृक्षांची तोड संबधित ठेकेदारांनी केली आहे. त्या वृक्षांची लागवड झालेली दिसत नाही. अशीच परिस्थिती महाड -पंढरपूर रस्त्यावरील वृक्षांची होता कामा नये. जी वृक्ष तोडली जातात त्यांचीच लागवड करावी.
सचिन देशमुंख
सह्याद्री रेक्यू टीम, भोर