महाराष्ट्र राज्य सरकारने आपला अर्थसंकल्प सादर करताना महिलांसाठी व शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची खिरापत दिली आहे त्यातलीच महिलांसाठी असणारी एक महत्त्वाची योजना म्हणजे ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” या योजनेच्या लाभार्थ्याला महिना दीड हजार रुपये दिले जाणार असून त्यासाठी तहसीलदार उत्पन्न दाखला हा महत्त्वाचा निकष आहे आणि हाच दाखला मिळविण्याकरता प्रथम तलाठी दाखला घेणे आवश्यक असल्याने सोमवारचा दिवस उजाडताच तलाठी कार्यालयातून तुफान गर्दी पाहायला मिळाली.
या योजनेचा कालावधी १ जुलै ते १५ जुलै असा असल्याने प्रत्येकजण कागदपत्रकांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त झाला आहे. २१ ते ६० वर्ष वयोगटातील महिलांना याचा लाभ घेता येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील रहिवासी, विवाहित, विधवा, घटस्फोटीत ,परित्यपक्त्या आणि निराधार महिला तसेच ज्यांचे कुटुंबाचे आर्थिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणाऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. त्यासाठी अर्ज पोर्टलवर,मोबाईल ॲप, सेतू सुविधा केंद्र ,किंवा गावातील अंगणवाडी सुविधा केंद्रात भरावयाचे आहेत. अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना , इन्कमटॅक्स भरणाऱ्यांना, कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत असेल, किंवा निवृत्ती वेतन घेत असेल , ज्यांच्याकडे ५ एकरापेक्षा जास्त जमीन असेल किंवा कुटुंबातील कोणाकडे चार चाकी वाहन असेल (ट्रॅक्टर सोडून) अशा व्यक्तींच्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार मिळणार नाही. तालुक्यातील गावा गावांसाठी असणारे तलाठी त्यांची कार्यालये ही भोर शहरात असल्याने शहरात ग्रामीण भागातुन येणाऱ्या महिलांचीच सकाळपासून मोठी गर्दी असल्याचे चित्र दिसून आले.