भोरः आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी आपल्या प्रचार दौऱ्याची सुरूवात या विधानसभा मतदार संघात असलेल्या दुर्गम भागातून केली आहे. दुर्गम भागात असणाऱ्या वाड्या, वस्त्या आदी गावांना थोपटे हे भेट देत असून नागरिकांशी संवाद साधत आहे. येथील एका दुर्गम भागातील प्रचार दौऱ्यात संग्राम थोपटे यांनी भोर महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच राज्य सरकारवर ताशेर ओढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
मागच्या पाच वर्षांमध्ये या भागात रस्ते, मंदिर, स्मशानभूमी आदी विकासकामे झाली आहेत. महाविकास आघाडीमध्ये कोणही बंडखोरी केलेली नाही. मात्र, भोर महायुतीमध्ये बंडखोरी झालेली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून युतीची वज्रमुठ दाखविण्याचा प्रयत्न केला खरा पण तिकीट दिल्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष झाल्या. प्रत्येकवेळी त्यांनी व्यक्तीगत टीका केली. त्यांच्याकडे सांगायला विकास कामे नाहीत, म्हणून ते टीका करीत असतात. यामुळे जनताजनार्दन योग्य वेळी योग्य निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले. यावर भाष्य करीत थोपटे यांनी भोर महायुतीवर टीकास्त्र डागले.
अजित पवारांचे नाव न घेता टीका
शरद पवार साहेबांच्यामुळे जे राजकारणात आले. लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी युती सरकार साथ देत युती सरकारमध्ये सहभागी झाले. यावर त्यांनी विकासाच्या मुद्यावर गेलो असल्याचे सांगितले. असे अजित पवार यांचे नाव न घेता थोपटे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. तसेच वाढलेली महागाई, देशात आणि राज्यात महिलांवरील होणाऱ्या अन्याय अत्याचारावर प्रश्न उपस्थित करुन सरकाराला जाब विचारला आहे.
शंकर मांडेकर यांना प्रश्न
युतीकडून शंकर मांडेकर यांच्या नावाची घोषणा होताच अनेकजणांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. हीच लोकं पत्रकार परिषदा घेऊन सांगत होती की, तिकीट कोणालाही मिळाले तरी त्याचे काम करणार आता काय झाले असा सवाल थोपटे यांनी उपस्थित केला. युतीकडून रात्रीत आयत केलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली. आयत केलेल्या उमेदवाराने तीन ते चार वेळा पक्ष बदलेला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी मी मूळचा राष्ट्रवादीचा असल्याचे म्हटले आहे. मग लोकसभेला आमच्याबरोबर काय करीत होता असा प्रश्न संग्राम थोपटे यांनी युतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना विचारला आहे. हे ज्या पक्षात असतात त्या पक्षाचा कधीच प्रचार करीत नसल्याची टीका देखील त्यांनी केली.