भोरः येत्या काही दिवसांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. भोर विधानसभा क्षेत्रात अनेक इच्छुक उमेदवार आमदारकी लढविणार असल्याचे समजते. यातच भाजपचे भोर विधानसभा प्रमुख किरण दगडे यांच्याकडून भोर, वेल्हा(राजगड) आणि मुळशी तालुक्यातील नागरिकांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर किराणा किटचे वाटप करण्यात आले. किराणा किट घेण्यासाठी महिला, नागरिकांची मोठी झुंबड उडालेली मिळाली आहे. तब्बल 18 हजार नागरिकांना या किराणा किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भोर विधानसभा क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक उमेदवार मैदानात उतरल्याचे पाहिला मिळत आहे. भोर विधानसभा क्षेत्र हा खरंतर काँग्रेसचा बाल्लेकिल्ला मानला जातो. थोपटे परिवाराचे प्रभूत्व या मतदार संघावर राहिलेले आहे. किरण दगडे हे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. दगडेंकडून देखील मतदार संघात शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. नागरिकांसाठी धार्मिक यात्रांचे आयोजन त्यांच्या मार्फत करण्यात आले होते.
किरण दगडे यांनी तालुक्यात कोणत्याही प्रकारची विकास कामे झालेली नाहीत, असे म्हणत काम करण्याची संधी द्यावी. असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना नागरिकांना केले आहे. आजपर्यंत जो बोलंलो ते करून दाखवलं आहे आणि यापुढे देखील करणार असल्याचे दगडे यांनी सांगितले. तसेच आठ वर्षांपासून मी हा कार्यक्रम घेत आहे. आम्ही या भागांत प्रत्येक सण साजरा करतो. नागरिकांना रोज दिवाळी वाटेल, असे काम करणार आहे. मतदार संघात ठिकठिकाणी कार्यक्रम घेणार आहोत. यामुळे महायुतीकडून किरण दगडे यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो का, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
किरणा किटमध्ये ‘या’ आहेत वस्तू
दिवाळी फराळ किराणा किट साहित्यमध्ये रवा, बेसण पीठ, पीठीसाखर, मैदा, डालडा, तेल, भाजके पोहे, भाजकी डाळ, मोती साबण, सुगंधी उटणे, पणती सेट, रांगोळी, चिवडा मसाला, मीठ असे साहित्य आहे.