पारगांवः (प्रतिनिधी धनाजी ताकवणे)
स्वातंत्र्यदिनानिमित्ताने “राष्ट्रध्वज सन्मान राखा” या उपक्रमांतर्गत दौंड तालुक्यातील पारगाव (सा.मा.) येथील शाळा, महाविद्यालयात निवेदने देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच १५ ऑगस्ट दिनी श्री तुकाई माता मंदिरासमोर क्रांतिकारक फ्लेक्स प्रदर्शन लावून विद्यार्थ्यांमध्ये क्रांतिकारकांचे शौर्य जागृत करून त्याद्वारे विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन राष्ट्र हितासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. याचा ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी पारगाव (सा. मा.) चे सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, प्रतिष्ठित मान्यवर, शाळा महाविद्यालये यांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक करून आजच्या पिढीला हे आवश्यक असल्याचे सांगितले.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागी देशभक्तांनी इंग्रजांचे अत्याचार चालू असताना राष्ट्रध्वज जमिनीवर पडू नये यासाठी लाठ्या खाल्ल्या, अत्याचार सहन केले, प्रसंगी प्राणाचेही बलिदान दिले, असे असताना मुलांना खेळण्यासाठी घेतलेले वाहनांवर लावलेले कागदी आणि प्लास्टिकचे ध्वज हे नंतर रस्त्यावर पडलेले पहायला मिळतात. यामुळे राष्ट्रध्वजासाठी बलिदान करणाऱ्या क्रांतिकारकांचा एक प्रकारे अवमानच आहे. काही जण तिरंग्याच्या रंगाप्रमाणे स्वत:चा चेहरा आणि शरीर रंगवतात. तसेच राष्ट्रध्वजाच्या रंगातील कपडे घालतात, यामुळे देखील राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हे विद्यार्थ्यांच्या मनावर आताच बिंबवायला हवे. अनावधानाने देखील राष्ट्रध्वजाचा अवमान तथा विटंबना विद्यार्थ्यांकडून होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे असे या निवेदनात म्हटले आहे.
हिंदू जनजागृती समिती गेल्या २१ वर्षांपासून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा हा उपक्रम राबवत आहे. या अंतर्गत व्याख्याने घेणे, प्रश्नमंजुषा घेणे, हस्तपत्रके वाटणे, भित्तीपत्रके लावणे, रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करणे, प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री रोखणे आदी कृती करत आहेत.