नसरापूर : दिवळे (ता. भोर) येथील पोल्ट्री व्यावसायिकाची तब्बल एक कोटी २६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संतोष विठ्ठल बाठे (वय ४६) यांनी संतोष ट्रेडर्स, फलटणचे संतोष सदाशिव गायकवाड (रा. तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा) याच्या विरोधात राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गायकवाडवर आधीही अशाच प्रकारे इतर व्यावसायिकांची फसवणूक केल्याचे समोर आले असून, त्याच्याविरुद्ध विविध ठिकाणी गुन्हे नोंद आहेत. अशी माहिती फिर्यादी बाठे यांनी दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाठे यांनी २०१८ ते २०२० या कालावधीत ‘छत्रपती ॲग्रोटेक प्रा. लि.’ या नावाने पोल्ट्री व्यवसाय सुरू केला होता. याच दरम्यान गायकवाड याने स्वत:ला पोल्ट्री माल पुरवठादार म्हणून ओळख दिली आणि बाठे यांचा विश्वास संपादन केला. प्रारंभी काही व्यवहार सुरळीत पार पडले. त्यानंतर गायकवाड याने बाठे यांना आश्वासन दिलं की, “तुमच्या पोल्ट्री खाद्य निर्मितीसाठी लागणारा मका मी वेळेवर पुरवतो.” या आश्वासनाच्या आधारे बाठे यांनी व्यवहार सुरू ठेवण्यासाठी गायकवाडकडे कंपनीच्या नावाचे दोन कोरे सुरक्षा धनादेश सुपूर्त केले.
मात्र, बाठे यांनी प्रत्येक व्यवहाराचे पैसे वेळेवर दिले असतानाही गायकवाडने कोऱ्या धनादेशांचा गैरवापर करून फसवणुकीची खेळी खेळली. कोविड लॉकडाऊनच्या काळात, व्यवसाय पूर्णतः ठप्प असतानाही, २४ जुलै २०२० रोजी गायकवाडने ७९ लाख ५४ हजार रुपयांचा धनादेश बाऊंस झाल्याची नोटीस वकिलामार्फत पाठवली. यानंतर, ३१ ऑगस्ट २०२० रोजी दुसरी नोटीस पाठवत ४८ लाख ४९ हजार रुपयांची रक्कम मागितली. या नोटिसांमध्ये गायकवाडने २५ ट्रक क्रमांकांच्या आधारे माल पाठविला असल्याचा दावा केला होता. त्यासोबत खोट्या पावत्या व बनावट बिले जोडण्यात आली होती.
फिर्यादी बाठे यांनी असा कोणताही माल मागवलेला नसल्याने त्यांनी ट्रक क्रमांकांची तपासणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करून घेतली. तेव्हा या २५ वाहनांपैकी बहुतेक गाड्या दुचाकी, कार, मिनीबस व ऑटोरिक्षा असल्याचे स्पष्ट झाले. म्हणजेच, बनावट ट्रक क्रमांक, खोट्या बिलांचे बनावट व्यवहार आणि चुकीच्या दस्तऐवजांच्या आधारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
या संपूर्ण प्रकारामुळे बाठे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, गायकवाडच्या विरोधात फसवणुकीसह संबंधित कलमांखाली राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.
दरम्यान, गायकवाड याने यापूर्वीही इतर व्यावसायिकांची अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचे बाठे यांनी सांगितले. त्याच्याविरोधात केसेस सुरू असून, अशा प्रकारे व्यावसायिकांना गंडवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.
हा प्रकार उघड झाल्यानंतर व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. केवळ बनावट कागदपत्रे, वाहन क्रमांक आणि फसव्या पद्धतीने व्यवहार करून इतक्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक कशी शक्य झाली, याची चौकशी पोलीस करत असून, व्यावसायिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.