खेड-शिवापुर, ता. ७ : आज पर्यंत शहरात सुरु असलेल्या अनधिकृत वेश्या व्यवसायाचे पेव आता ग्रामीण भागात देखील पाहायला मिळत असून याकडे पोलिस प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. पुणे सातारा महामार्गावरील शिंदेवाडी (ता. भोर) परीसरातही शहरातील अनधिकृत वेश्या व्यवसायाचे पेव येऊन पोचले आहे.पुणे सातारा महामार्ग लगत असणाऱ्या जुना जकात नाका परीसरात रस्त्यावर अनधिकृत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला उभ्या राहत असून परीसरातील काही लॉजिंगमध्ये त्यांच्याकडून अनधिकृत वेश्या व्यवसाय केला जात आहे.
गेल्या काही वर्षापासून नवले पूल कात्रज बाह्यवळण महामार्गावर असलेल्या लॉजिंगमध्ये या ठिकाणी रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या काही महिलांकडून अनधिकृतपणे वेश्या व्यवसाय सुरु आहे. या परीसरात सुरु असलेल्या अनधिकृत वेश्या व्यवसायाचे पेव आता कात्रज नवीन बोगद्याच्या जवळ असलेल्या पुणे सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी (ता. भोर) परीसरात पोचले आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील कात्रज नवीन बोगदा आणि जकात नाका परिसरातील रस्त्यावर अनधिकृत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला उभ्या राहतात. येथून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना हातवारे आणि इशारे करून खुणावतात. त्या या परीसरात असलेल्या काही लॉजिंगमध्ये अनधिकृतपणे वेश्या व्यवसाय करत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
शिंदेवाडी वेळू या परीसरात अनेक लहान-मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यामध्ये काम करणारा महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच या भागात अनेक लोकवस्ती आहेत. त्यामुळे महिला आणि शाळकरी मुलांची येथून ये-जा सुरु असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या परीसरात अनधिकृत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला उभ्या राहत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरीकांमध्ये असुरक्षिततेचे भावना निर्माण झाले आहे.
लॉजिंग व्यवसायिकांकडून वेश्या व्यवसायाला खत पाणी
गेल्या काही दिवसांपासून या भागात अनधिकृत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला उभ्या राहत आहेत. परीसरात असलेल्या काही लॉजिंग व्यवसायिकांकडून त्याला खतपाणी घातले जात असल्याचे येथील अनेक स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या भागात सुरु झालेल्या या अनधिकृत प्रकारावर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरीक करत आहेत.
पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष?
पुणे जिल्हा सर्वत्र अवैध व्यवसाय बंद असताना भोर तालुक्यातील राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील शिंदेवाडी या ठिकाणी हा अनधिकृत व्यवसाय चालतो कसा? याच्यावर पोलीस प्रशासनाचे लक्ष नाही का? या वेश्याव्यवसायाला चालना देणारा कोण? पोलीस प्रशिक्षण जोडीचा होते का? की दुर्लक्ष केले जाते? असा सवाल आता नागरिकांमधून केला जात आहे.
” या परीसरात असे काही प्रकार सुरु असतील तर सबंधितांवर पोलिसांकडून निश्चित कारवाई करण्यात येईल.”- राजेश गवळी राजगड पोलिस निरीक्षक