भोर-पसुरे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, साईट पट्टीचीदेखील दयनीय अवस्था, खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी
भोर -पसुरे रस्त्यावर पृथ्वीराज पेट्रोल पंपाशेजारी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असुन रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना व प्रवासी वाहतूकदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी संबंधित प्रशासनाकडे नागरिकांनी वारंवार केली असून प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष देऊन प्रशासन सुस्त असल्याचे दिसत आहे.
सदरचा हा रस्ता वेळवंड खोऱ्यातील गावांसह महुडे खोऱ्यातील गावांना जातो. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. शेजारी पेट्रोल पंप, मोठी राजतेज सोसायटी, बाजूला मोठे महाविद्यालय, इंग्लिश मिडीयम स्कूल,एच पी गॅस एजन्सी, हॉटेल , तसेच मालक वाहतूक अवजड वाहनांचा वजन काटा आहे त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या अवजड वाहनांसह , प्रवासी वाहतूक, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, बाजारासाठी भोर शहराकडे येणारे जाणारे नागरिक, सकाळी फिरायला आलेले जेष्ठ नागरिक,कामावर जाणारे दुचाकी वाहनचालक यांची सारखीच वर्दळ असते. या ठिकाणी खड्डे झाल्याने अनेकांचे छोटे मोठे अपघात होऊन अनेकांना दुखापत झाली आहे.वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. खड्यात पाणी साचल्याने रस्त्यावर पायी चालत जाणा-यांचे व वाहन चालकांचे खड्ड्यांमुळे वाद होत आहेत. तसेच या रस्त्यावरकडेची साईड पट्टीही खोलगट झाली असून खचली आहे. एकाच वेळी दोन वाहने या रस्त्यावर बसत नाहीत. संबंधित विभागाने याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन हे खड्डे बुजवण्याची व रस्त्याची साईड पट्टी वाढवण्याची मागणी भोलावडे गावचे विद्यमान सरपंच प्रविण जगदाळे यांनी वया रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनचालकांसह पायी प्रवास करणा-या नागरिकांनी केली आहे.
तसेच भोर शहरात ये जा करण्यासाठी असणाऱ्या दोन्ही पुलावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे.जुन्या राणी लक्ष्मीबाई पुलावर पाण्याचे तळे साचले आहे व नवीन पुलावर पाण्याचे तळे व मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांसह नागरिकांना देखील कसरत करावी लागत आहे