राजगड न्युज लाईव्ह: अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची दोन तुकडे करून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर पहिल्यांदाच पवार कुटुंब निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामध्ये आता थेट बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळेअशी लढत म्हणण्यापेक्षा अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी बारामतीसह पुणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील राजकीय अस्तित्वाची असेल. या लढाईत बारामतीची काका की पुतण्याची याचा सुद्धा फैसला होणार आहे. राज्यात गेल्या पाच दशकांपासून ज्या नावाभोवती राजकारणाचा, समाजकारणाचा, आरोप प्रत्यरोपांचा आणि अनके कपोलकल्पितांचा केंद्रबिंदू ठरला आहे अशा पवार कुटुंबियांमध्ये अभूतपूर्व अशी फूट पडली आहे.
पक्षातील बंडा नंतर प्रथमच लढाई
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी औपचारिकपणे जाहीर करण्यात आली आहे, तर अजित पवार गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे ज्या पवार कुटुंबाने गेल्या साडेपाच दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपलं दबदबा ठेवला, कौटुंबिक नाती किती महत्त्वाची आहे हे प्राधान्याने दाखवून देण्याचा प्रयत्न केला, राजकारण घरापर्यंत कधी येऊ दिले नाही ते आज कुटुंबच पूर्णतः राजकारणामध्ये विभागलं गेलं आहे. अजित पवार यांनी बंडाळी केल्यानंर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या वाट्याला गेलं आहे. त्यामुळे बारामतीतील लढाई ही पहिल्यांदाच या सर्व घडामोडीनंतर असणार आहे.
पक्ष फुटल्यानंतर कुटुंबातही फूट
बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे अशी लढत होत असली तरी ही लढत निश्चितच या दोघींमधील नसेल. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामधील या नेत्यांमध्ये असणार आहे. बारामतीवर वर्चस्व कुणाचा असणार याचे उत्तर देणारी ही निवडणूक असणार आहे, गेल्या काही दिवसांपासून बारामतीची जागा सातत्याने चर्चेत होती. जेव्हा सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीचा विषय चर्चेत आला तेव्हा बारामतीमध्ये ठिणग्या पडण्यास सुरुवात झाली. पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर अजित पवार यांनी सातत्याने शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर टीका केली होती. या टीकेचे पडसाद पवार कुटुंबामध्ये सुद्धा उमटले आहेत. अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार, पुतणे युगेंद्र पवार, विरोधात गेले आहेत. पवार कुटुंबामध्ये सुद्धा पक्षांतर्गत झालेल्या घडामोडीवरून परिणाम झाल्याचे दिसून आलं आहे. बारामतीमधून निवडणूक लढवण्याचे निश्चित केल्यानंतर अजित पवार यांनी सातत्याने शरद पवार बारामतीमध्ये भावनिक करतील वगैरे असे आरोप करत वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतर ते स्वतःच भावनिक वातावरण करताना दिसून आले. मला कुटुंबामध्ये एकटं टाकलं गेला आहे, तुम्ही मला एकटं टाकू नका, अशा पद्धतीने प्रचार करताना दिसून आले. त्यामुळे या निवडणुकीला भावनिक किनार सुद्धा असणार आहे.
अजित पवारांचा सख्खा भाऊ विरोधात
अजित पवार यांनी बारामतीमध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका सुरू केल्यानंतर त्याचे पडसाद पवार कुटुंबियांमध्ये उमटले. अजित पवार यांची सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे पहिल्यांदा अजित पवारांविरोधात बोलताना थेटपणे दिसून आले. आमदार रोहित पवार सुप्रिया सुळे आणि शरद पवारांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. युगेंद्र यांनी राजकीय भूमिका घेतल्यानंतर त्यांचे वडील श्रीनिवास पवार यांनी सुद्धा काटेवाडीमध्ये गेल्यानंतर अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. शेत कसायला दिले म्हणून शेतीचे मालक होत नाही अशा शब्दात त्यांनी अजित पवारांवर तोफ डागली होती.
बारामती मतदारसंघ आहे तरी कसा?
बारामती लोकसभा मतदारसंघावर नजर टाकल्यास बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यामध्ये दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला या सहा मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये दोन काँग्रेसचे आमदार आहेत, दोन राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तर दोन भाजपचे आमदार आहेत. यामुळे भाजपच्या दोन आमदारांची ताकद अर्थातच अजित पवार यांच्या मागे असेल. दोन काँग्रेस आमदारांची ताकद सुप्रिया सुळे यांच्या मागे असेल. बारामतीमधील ताकद कोणाच्या बाजूने याचे उत्तर मात्र हे चार जून रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानातूनच कळणार आहे.
बारामतीचे आमदार अजित पवार जरी असले तरी त्याठिकाणी शरद पवार, अजित पवार तसेच सर्व पवार कुटुंब एकत्रित होते. त्यामुळे ती नेहमीच कुटुंबाची ताकद राहिली आहे. मात्र, लोकसभेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये ही ताकद विभागली गेली असणार आहे. यामध्ये थोरल्या पवारांमागे किती बारामतीकर उभे राहिले, अजित पवारांमागे किती उभे राहिले? पक्षांतर्गत झालेली बंडाळी लोकांना पटली आहे की नाही? बारामतीसह पुणे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात कुणाचा अधिकार असेल हे दाखवणारी ही निवडणूक असणार आहे.
बारामती लोकसभेला जातीचा फॅक्टर
बारामती लोकसभेला नेहमीच धनगर समाजाचा फॅक्टर सुद्धा राहिला आहे. ही गोष्ट विचारात घेऊनच शरद पवार यांनी रासपला जेव्हा महायुतीमध्ये दुय्यम स्थान देण्यात आले तेव्हा माढामधून लढण्याची थेट ऑफर महादेव जानकर यांना दिली होती. इतकेच नव्हे तर जवळपास त्यांची उमेदवारी सुद्धा निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे जानकर हे आता माढामधून राष्ट्रवादीचे उमेदवार असतील अशी चर्चा होती. बारामतीमधील 20 टक्के धनगर मतांचा प्रभाव लक्षात घेऊन महायुतीने मोठी खेळी करताना जाणकारांना अखेर आपल्या गोटात सामील करून घेतले. परभणीची जागा महादेव जानकर यांना राष्ट्रवादी अजित पवार कोट्यातून देण्यात आली. त्यामुळे बारामतीमधील धनगर मते आता कोणाकडे वळतात याकडे लक्ष असेल.
महादेव जानकरांची जोरदार लढत
महादेव जानकर यांनी 2014 मध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवताना मोठी मते घेतली होती. त्यांना जवळपास चार लाख 51 हजार 843 मते मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये असणारा धनगर समाजाचा प्रभाव दिसून येतो. या सर्व पार्श्वभूमीवर आता ही मते कोणाच्या वाट्याला जाणार? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.
विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर
दुसरीकडे विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभेतून शड्डू ठोकताना कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. गेल्या एक महिनाभरापासून विजय शिवतरे यांच्याकडून घणाघाती आणि वैयक्तित पातळीवर प्रहार होत असताना अजित पवार यांनी कुठल्याही प्रकारचे प्रत्युत्तर ने देता संयम ठेवला होता. मात्र, अखेर विजय शिवतारे यांची भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थित झाल्यानंतर बंड शांत करण्यात यश आलं. त्यांचं बंड शांत झाल्यानंतर सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली हे नमूद करावं लागेल. शिवतार यांनी ज्या प्रकारे आक्रमक भूमिका घेतली होती ती निश्चितच बारामतीमध्ये मिठाचा खडा टाकणारी होती. मात्र, आता विजय शिवतारे यांचं बंड थंड झाल्याने मोठा अडथळा मार्गातील दूर झाला आहे.
जी स्थिती पुरंदर तालुक्यात दिसून आली तीच स्थिती इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा दिसून आली होती. इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील राजकीय वाद नव्याने सांगण्याची गरज नाही. दत्तात्रय भरणे यांना नेहमीच साथ देण्याचं काम अजित पवार यांनी केलं आहे. त्यामुळे जेव्हा सुनेत्र पवारांची उमेदवारी चर्चेत आली तेव्हाच भाजपच्या हर्षवर्धन पाटील गटाकडून विरोध करण्यात आला. मुलगी अंकिता पाटील यांनी सुद्धा थेट विरोध केला होता. लोकसभेच्या बदल्यामध्ये विधानसभेचा मार्ग सुकर करण्याची सुद्धा मागणी केली होती. मात्र, तो सुद्धा वाद अखेर फडणवीस यांच्या कोर्टापर्यंत गेला आणि मग त्यांची समजूत घातल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा आता महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे दोन प्रमुख विरोध आणि जानकर यांना परभणीमध्ये दिलेली उमेदवारी ही अजित पवारांची जमेची बाजू आहे.