भोरः विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदेशीर पिस्टल बाळगणारे एकास पोलिसांनी अटक केली आहे. १२ नोव्हेंबर रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भोर विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून कोळवडी गावाच्या हद्दीतील नसरापूर वेल्हा रस्त्यालगत कुंगवडी बस थांब्या जवळ एक व्यक्ती कंबरेला पिस्टल लावून उभा आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संबधित ठिकाणी जावून पिस्टल बाळगणाऱ्याना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक अनुषंगाने बेकायदेशीर रित्या पिस्टल बाळगणारे अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी शुभम सचिन उफाळे (वय २४ वर्ष रा. मार्गासनी, ता. वेल्हा, जि. पुणे) यांना ताब्यात घेऊन त्यांची अंग झडती घेतली असता, त्याच्या कमरेला खोचलेला एक गावठी कट्टा मिळून आला. तसेसच त्याची मॅग्झीन तपासली असता त्यामध्ये एक जिवंत काडतूस मिळून आले.
आरोपी २ वर्षांसाठी तडीपार असल्याची माहिती
त्याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचेकडे कोणताही वैध परवाना नाही अशी माहिती पोलिसांना मिळाली. तसेच या प्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संबंधितावर सिंहगड पोलीस स्टेशन पुणे शहर ,पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा हद्दीतुन 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. या आरोपीवर एकूण 5 गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात निषन्न झाले आहे. वरील आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तापासकामी राजगड पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पो.हवा. मंगेश ठिगळे, पो.हवा. अमोल शेडगे, पो.हवा. बाळासाहेब खडके, पो.कॉ. मंगेश भगत यांनी केली आहे.