डीजेचे डॉल्बीचे नियम कागदावरच ; कर्णकर्कश आवाजाने ज्येष्ठांना वयोवृद्धांना ,लहान मुलांना त्रास
सध्या सर्वत्र धुमधडाक्यात लगीन सराई चालू झाली असून जो तो आपले लग्न कसे जोमाने, जोरात होईल याकडे लक्ष देत आहे. म़ोठ्या आवाजाचा डिजे असेल तर लग्न सोहळा जोरदार असे सध्या चित्र पहायला मिळत आहे. घरातील व छोटे मोठे कार्यक्रम म्हटले तर डीजे साउंड सिस्टीम पाहीजेच असे आजचे तरुण घरात सांगत आहेत. तरूणाईनेही व्यवसाय म्हणून डिजेला पसंती दिली असुन सर्वत्र डिजेंची संख्याही भरमसाठ वाढल्याने जोशात असलेली तरूणाई ध्वनीप्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून कार्यक्रमातुन दिवस रात्र कर्णकर्कश आवाजात डिजे वाजवत आहे त्यामुळे डिजेला आवरा , नवख्या तरुणाईला सावरा असे चित्र निर्माण झाले आहे.
हल्ली शहरासह , ग्रामीण भागात कुंकू, साखरपुडा, लग्न ,बारसे, मुंज, जावळ, वाढदिवस, उटणे हळद, नवरदेव पाया पडणे, वास्तुशांती, देवांचे कार्यक्रम, श्रीवंदन , लग्नवरात, लग्नाची पूजा असा सर्वच कार्यक्रमातुन डिजे डॉल्बीचे फॅड वाढले आहे. हौसेला मोल नाही याप्रमाणे प्रत्येकजण आपली प्रतिष्ठा पणाला लावून कितीही खर्च झाला तरी आपले शुभकार्य कसे मोठे होईल याकडे लक्ष देत आहेत यामध्ये नवख्या तरुणाईचा आग्रह मोठा आहे.जुन्या चालीरीती रुढी परंपरा संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. भव्य नवरदेव पायापडणी सोहळा, भव्य हळद उटणे , नवरदेव श्रीवंदन ,भव्य दिव्य वरात असे लग्नाचे नवीनच सोहळे बॅनर तयार होत असुन डिजे साऊंड सिस्टीम, फोकस लाईट डिझाईन यांचा प्रसार वाढत आहेत.
या कार्यक्रमांतुन वाजणा-या प्रचंड मोठ्या आवाजाच्या वाजणा-या डिजेंमुळे जेष्ठ, वयोवृद्ध व आजारी नागरिकांना व लहान मुलांना मोठा त्रास होत आहे. कानाचे पडदे फाटतील अशा कर्णकर्कश मोठया आवाजाने हृदयाचे ठोके वाढविणारी धडधड व डोळ्यांनाही अतिनील लेजर लाईट, फोकसच्या किरणांमुळे प्रचंड त्रास होत आहे हृदयाला ,शरीराला कितीही हादरे बसले ,तरी आजची तरुणाई मात्र या डिजेवर बेभान होऊन थिरकताना, नाचताना दिसत आहे. काही अतिउत्साही कार्यकर्त्यांचे महागडे मोबाईल फोन या उत्साहाची शुटींग करताना या लेझर लाईटने बिघडले जात आहेत. प्रशासनाकडूनही डीजेला सहज परवानगी मिळत असुन व आवाजाच्या क्षमतेचे, डेसिबलचे नियम कागदावरच राहत असुन प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे.
शहरात पेठेतुन, बंदिस्त गावात किंवा वाडी वस्तीवर असणारी रात्रीची डिजेची वरात , हळद उटणे, मोठ्या आवाजाच्या धक्क्याने, दणदणाट होऊन धडकी भरणा-या आवाजाने दुमदुमून घरातील भांडी, वस्तू जमिनीवर पाडत आहेत. परंतु शुभ कार्य असल्याने कोणी काहीच बोलत नाही. रात्री घरातील कुटुंबातून बाहेर पडलेली आजची नवखी तरुणाई बाहेर जाऊन काय करते हे मात्र आई-वडिलांच्या लक्षात येत नाही हळूहळू अशाच रात्रीच्या बाहेर राहण्याने तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. यातुन हळूहळू गुन्हेगारी देखील डोके वर काढत आहे. आपल्याला कोणीतरी बघत असेल याचे भान न ठेवता हि तरुण मुले नाचण्यात एवढी दंग असतात की वेडेवाकडे चाळे करत नाचत ,ओरडत आरडत हि तरुणाई वेडी बेभान होत नाचत आहेत याचाच परिणाम पुढे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर होताना दिसत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर डीजेला आवरा व तरुणाईला सावरा असे जुने बुजुर्ग सांगत आहेत.
” बेफिकिरपणे आणि नियमबाह्य डीजे चालविणाऱ्यांवर व डिजे मालकांवर गुन्हा दाखल केला जाईल. ब-याच ठिकाणी मुले अभ्यास सोडून डिजेच्या मागे फिरत असतात .पालकांनी १०ते १६ वयोगटातील मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.ऐन तारुण्यात पदार्पण करताना मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. समाजाचे नूकसान करणा-यांवर आणि बेकायदेशीररित्या, कायदा सुव्यवस्था मोडणा-यांवर कडक कारवाई केली जाईल” अण्णासाहेब पवार -पोलीस निरीक्षक भोर पोलीस स्टेशन.