उन्नती महिला प्रतिष्ठान व तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून अध्यक्षा सीमा तनपुरे यांचा नाविन्यपूर्ण महत्वचा उपक्रम
भोरला उन्नती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व तनिष्का व्यासपीठा सदस्या सीमा तनपुरे या नेहमीच सामाजिक लोकोपयोगी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात असाच एक उपक्रम म्हणजे विधवा महिलांचा हळदी कुंकू समारंभ असा उपक्रम घेत या महिलांचा सन्मान भोर मधील नागोबा आळीतील गणेश मंदिरात करण्यात आला. भोर शहर व ग्रामीण भागातील ५० विधवा महिलांना निमंत्रित करुन त्यांची ओटी भरुन हळदी कुंकवाचा मान देत सन्मान करण्यात आला. विधवा महिलांना विधवा न संबोधता गंगाभागिरथी या नावाने संबोधले जावे असे सांगण्यात आले.याच वेळी विधवा प्रथा बंद करण्याची शपथ सर्व महिलांनी घेतली.
आपल्या समाजात अजूनही पतीच्या निधनानंतर तिच्या पत्नीस विधवा म्हटले जाते, तिला शुभकार्यात ,समाजात कमी स्थान दिले जाते. त्यांचे जीवन एक प्रकारे वेगळे असते. समाजातील या महिलांविषयीच्या जुन्या रुढी बंद हाव्यात , सार्वजनिक ठिकाणी, लग्न समारंभासह इतर समारंभात त्यांना मान मिळावा, त्यांना सन्मानाची वागणूक दिली जावी असे तनिष्काच्या अध्यक्षा सीमा तनपुरे यांनी सांगितले. या विधवा महिलांना समाजात मानाचे स्थान प्राप्त व्हावे, त्यांना सर्व शुभकार्यात, सणावाराला, समारंभातुन मानाने जाता यावे यासाठी हळदी कुंकू समारंभात त्यांचा हळदी कुंकू लावून सन्मान करण्यात आला. कोणीही या महिलांना विधवा न संबोधता गंगाभागिरथी या नावाने संबोधले जावे असे आवाहन यावेळी अध्यक्षा सीमा तनपुरे यांनी केले. यावेळी या कार्यक्रमास भाग्यश्री वरटे, स्मिता सुर्वे , मीना चव्हाण, अश्विनी धोंडे, विजया डिंबळे , द्रोपदी भेलके , अर्चना रोमण, माधुरी दबडे अशा महिला उपस्थित होत्या .अनेक महिलांचा यावेळी सन्मान झाल्याने त्या भारावुन गेल्या काहींना अश्रू अनावर झाले.अत्यंत चांगला उपक्रम असुन याचे सर्वत्र कौतुक होत आहे.