भोरः येथील एका गावात अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरडीवर एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणी अल्पवयीन आरोपीला राजगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे.
ही घटना राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुणे-सातारा महामार्गावरील एका गावात घडली आहे. या घटनेची माहिती राजगड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र आरोपीने पलायन केल्यामुळे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वेगवान गतीने तपासाची चक्रे फिरवून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून केले पलायन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुरडी अल्पवयीन आरोपीच्या शेजारी राहत असून त्यांची एकमेकांशी ओळख होती. आरोपी अल्पवयीन मुलाकडे पीडित चिमुरडी खेळण्यास येत असल्याची. लहान मुलीची आई कपडे धूत असताना अल्पवयीन आरोपीने चिमुरडीला त्याच्या खोलीत नेऊन आतून कडी लावून घेतली. त्यानंतर मुलीच्या रडण्याचा आवाजाने मुलीची आई बंद असलेल्या खोलीकडे धावत गेली. तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपीने दरवाजा उघडला नाही. आरडाओरडा केल्यानंतर अल्पवयीन आरोपीने मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणात अल्पवयीन मुलाने त्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले असून, या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.
एकामागोमाग घडणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर
सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देखील सोमवारी चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच दोन वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलानेच लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.