शिरवळ: रोटरी क्लब शिरवळ-खंडाळा या प्रतिष्ठित सामाजिक संस्थेच्या नवीन अध्यक्षपदी राहुल तांबे यांची निवड करण्यात आली आहे. सोमवारी दि. २९ रोजी सायंकाळी सात वाजता शिरवळ येथील ज्ञानसंवर्धिनी शाळेच्या सभागृहात आयोजित एका भव्य समारंभात त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी रश्मी कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न झाला.
यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष राहुल तांबे म्हणाले की, या वर्षी रोटरी क्लब पर्यावरण, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे जाहीर केले. नुकतीच रोटरी क्लबतर्फे लोहम येथील विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले, ही याची एक झलक आहे. या प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी शिरवळचे सरपंच रविराज दुधगावकर, गुरुदेव बरदाडे, दिलीप गुंजवटे, महादेव बधे, अमोल कबुले, रोहित जाधव, आनंद फडके, माजी आदर्श सरपंच छाया जाधव, दिलीप बोडरे, शोभाताई गायकवाड, मोहिनीताई गायकवाड ,शिरवळ ग्रामपंचायत सदस्य आणि रोटरी क्लबचे सर्व सभासद उपस्थित होते.