सासवडः प्रतिनिधी खंडू जाधव
पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर येथे सोमवती अमावस्या निमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मंदिर परिसरामध्ये गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली. पहाटे देवाची पूजा केल्यानंतर, मंदीर सकाळपासून भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. या दिवशी श्रीनाथ म्हस्कोबा महाराज स्नान करण्यासाठी नीरा नदीवरती आंघोळीसाठी जातात. यावेळी मोठ्या प्रमाणावर मानकरी, सालकरी भाविक भक्त ग्रामस्थ उपस्थित होते.
पालखी पुन्हा मंदिरात येत असताना वीर गावामधून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. अशा भक्तिमय वातावरणामध्ये सोमवती अमावस्या वीर येथे पार पडली. या यात्रेच्या निमित्ताने श्रीनाथ महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी तालुक्याच्या बाहेरून देखील भाविक भक्त देवाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी मंदीर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणवर भाविक भक्तांची रीग लागलेली होती. मंदिरात नाथ महाराजांच्या नावान चांगभलचा जयघोष करण्यात आला.