खेड शिवापूर, पुणे: पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर आज पहाटे राजगड पोलिसांनी सापळा रचून मोठी कारवाई केली आहे. सातारा बाजूकडून पुण्याकडे गुटखा (पान मसाला) वाहतूक करणारे वाहन थांबवून तपासणी केली असता अंदाजे एक कोटी पाच लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा-पुणे महामार्गावरून एका वाहनात गुटख्याची बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती राजगड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना खबर्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार खेड शिवापूरजवळील शिवरे गावाजवळ सापळा रचून वाहन (वाहन क्रमांक एम एच ०५ डिके ८१६७) थांबवले. तपासणीमध्ये या वाहनात अंदाजे एक कोटी पाच लाख रुपयांचा गुटखा आढळला.
बंदी असतानाही अशा प्रकारे गुटख्याची वाहतूक करण्याचा प्रयत्न होत असल्याचे उघड झाले आहे. राजगड पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.