खंडाळा: खंडाळा-लोणंद रस्त्यावरील म्हावशी गावच्या हद्दीत दुचाकीवरून निघालेल्या तरुणाचा हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि. ६ रोजी घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय राजेंद्र धायगुडे (वय ३०वर्षे, रा. अहिरे ता. खंडाळा) हा तरुण खंडाळ्याकडून घरी अहिरेच्या दिशेने निघाला होता. यावेळी सायंकाळी सातच्या वाजण्याच्या सुमारास म्हावशी येथील बाळसिद्धनाथ मंदिरालगतच्या उतारावर दुचाकी आली असताना अक्षयला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने दुचाकी बाजूला घेत अक्षय रस्त्यालगतच पडला.
यावेळी उपस्थितांचाच्या मदतीने अक्षयला ग्रामीण रुग्णालय खंडाळा या ठिकाणी आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले. मृत अक्षयचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने खंडाळा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस अंमलदार दत्ता दिघे हे करत आहेत. अक्षयच्या अशा जाण्याने अहिरे गाव आणि आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.