भोर तालुक्यात प्रथमच प्राध्यापक दिसणार निवेदकाच्या भूमिकेत
भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भोलावडे येथे कार्यरत असलेले प्राध्यापक विक्रम शिंदे यांची माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत प्रसारभारती संचलित आकाशवाणी पुणे केंद्र येथे निवेदक म्हणून नुकतीच निवड करण्यात आली. शिंदे हे इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत. विद्यार्थी प्रिय तसेच शिस्त प्रिय शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक ,सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच निवेदन केले आहे. एक उत्तम निवेदक म्हणून ते शहर आणि परिसरात ओळखले जातात. मार्च महिन्यात प्रसारभारतीच्या वतीने लेखी परीक्षा तसेच स्वर परीक्षण (परीक्षा) घेण्यात आली होती. त्यात उत्तीर्ण झाल्याने त्यांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली. मुलाखतीनंतर लागलेल्या अंतिम निकालानंतर त्यांची निवेदक म्हणून निवड करण्यात आली आहे.
आकाशवाणी केंद्र पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना आकाशवाणी पुणे येथे निवेदक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. भोर एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर ,जेष्ठ संचालक डॉ.सुरेश गोरेगावकर, डॉ.प्रदीप पाटील , प्राचार्य लक्ष्मण भांगे , विविध विद्याशाखांमधील शिक्षक मित्र ,पत्रकार बांधव तसेच भोर शहरातील नागरिकांकडुन शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होतं असून तालुक्यातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भोर तालुक्यात प्रथमच एक प्राध्यापक निवेदकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.