श्री बनेश्वर सेवा मंडळ,नसरापूर यांनी केला सन्मान
भोर– येथील जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम मुसळे यांना “वारकरी जीवन गौरव आदर्श पत्रकारिता पुरस्काराने गुरुवार (दि.२७) सपत्नीक सन्मानित करण्यात आले. भोर तालुक्यातील नसरापूर येथील श्री बनेश्वर सेवा मंडळ यांनी हा पुरस्कार दिला. सन्मानचिन्ह ट्रॉफी, पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कृष्णाजी रांजणे, नानासाहेब भिंताडे, संपतराव तनपुरे, आबा यादव, शस्त्रीजी महाराज व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मुसळे यांनी भोर, वेल्हा तालुक्यात मागील ४७ वर्ष निःपक्ष, पारदर्शी, विश्वासार्ह लेखणीतून सामाजिक, शैक्षणीक, राजकीय, सांस्कृतिक, ऐतिहासिक धार्मिक विषयावर विपुल लेखन केले आहे. त्यांनी दैनिक संद्या, केसरी, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स या मराठी वृत्त पत्रासह महाराष्ट्र हेरॉड या इंग्रजी व दैनिक भास्कर हिंदी दैनिकात काम केले आहे. सध्या ते केसरी, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दैनिक भास्कर(हिंदी ) मध्ये वृत्तांकन करतात. त्यांच्या या प्रदीर्घ कारकीर्दीची दखल घेऊन हा पुरस्कार दिल्याचे मंडळाच्या आयोजकांनी सांगितले. मुसळे यांचा यापूर्वी महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन सासवड, मावळा जवान संघटना वेल्हे, फुले प्रहार सामाजिक संस्था इंदापूर, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संघ पुणे, प्राथमिक आरोग्य केंद्र भोर, पद्मश्री डॉ. मनिभाई देसाई प्रतिष्ठान पुणे, अभियांत्रिकी विद्यालय धांगवडी, वाघ्या मुरळी संघटना महाराष्ट्र राज्य रोटरी क्लब ऑफ भोर आदी संघटनांनी सन्मान केला आहे.