भोर: आर्थिक परिस्थितीवर मात करून, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर रायरी (ता. भोर) येथील गणेश तुकाराम किंद्रे यांनी मोठे यश संपादन केले आहे. मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालय सहाय्यकपदी निवड होऊन त्यांनी आपल्या कुटुंबाचे आणि गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
गणेश हे लहानपणापासूनच अभ्यासात अतिशय हुशार होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण रायरेश्वर किल्याच्या पायथ्याशी असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर भोर येथील राजा रघुनाथराव विद्यालयातून ११वी आणि १२वी वाणिज्य शाखेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या वडिलांचे मुंबईतील वाशी मार्केटमध्ये मेवा मसाल्याच्या दुकानात काम असल्याने पुढील शिक्षणासाठी गणेश मुंबईला गेले. तेथे त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील मॉडर्न कॉलेजमधून बी.कॉम.ची पदवी मिळवली.
शिक्षण घेत असतानाच गणेश यांनी एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. अनेक प्रयत्नांनंतर अखेर पाच वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालय सहाय्यक परीक्षा उत्तीर्ण केली आहे. कोणत्याही खासगी शिकवणीशिवाय स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले.
“गणेशने आमचे स्वप्न पूर्ण केले”
गणेशचे वडील तुकाराम किंद्रे म्हणाले, “मुलाने उच्चशिक्षित होऊन चांगल्या नोकरीत जावे, हे आमचे स्वप्न होते. हालाखीच्या परिस्थितीतही गणेशने चिकाटी ठेवली आणि आज हे यश मिळवले. आम्हाला त्याचा अभिमान आहे.”