इंदापूर: (प्रतिनिधी सचिन आरडे)
मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या परिसरातील अतिक्रमणे दिलेल्या मुदतीत काढून टाकण्यात आली नाहीत, तर तुम्ही फार काळ खुर्चीवर राहणार नाहीत, असा सज्जड इशारा आमदार नितेश राणे (MLA nitesh rane) यांनी दि. १८ रोजी हिंदू जनआक्रोश मोर्चा वेळी येथे बोलताना प्रशासनास दिला. वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या परिसरातील अतिक्रमणे काढण्यात यावीत, या मागणीसाठी आमदार राणे यांच्या नेतृत्वाखाली ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. त्यानिमित्त इंदापूर नगरपरिषदेच्या मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते.
दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आमदार नितेश राणे यांचे इंदापूरात आगमन झाले. श्रीराम वेस नाक्यावरील विठ्ठलाच्या मुर्तीपासून आ. राणे, संग्राम भंडारे पाटील, माऊली चवरे, भारत जामदार, किरण गानबोटे, राहुल गुंडेकर यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहराच्या मुख्य रस्त्याने नगरपरिषदेच्या मैदानावर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सभेला सुरुवात झाली.
शिवाजी महाराजांच्या चरणी आपण नतमस्तक होतो, त्यांच्या घराण्यातील आद्यपुरुषाच्या गढीवर जर अतिक्रमण होत असेल, त्यांचा अवमान होत असेल, तर अशा गोष्टींना विरोध करणार नसून तर आम्हाला महाराजांसमोर नतमस्तक होण्याचा अधिकार आहे का, हा प्रश्न मनात घेवून आपण येथे आलो आहोत. कोणत्या पक्षाचा आमदार वा कार्यकर्ता म्हणून आलो नाही. स्वतःसाठी अथवा राजकारण करण्यासाठी कोणावर टीका करण्यासाठी येथे आलो नाही. हिंदू म्हणून बोलण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आलो आहे. इंदापूरात येवून वातावरण खराब करण्याचा, कायदा सुव्यवस्था बिघडवायची असा ही विषय नाही.
-आमदार नितेश राणे
महेश बोधले यांनी प्रास्ताविक केले. संग्राम भंडारे पाटील यांचे भाषण झाले. आ. नितेश राणे यांच्या हस्ते तहसीलदार जीवन बनसोडे यांना निवेदन देण्यात आले. गढीवरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी तीन दिवसांचे उपोषण करणा-या भारत जामदार यांचा आ. नितेश राणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.