भोर प्रतिनिधी – कुंदन झांजले
भोर– फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी (हुताशनी पौर्णिमा) आज गुरुवार (दि.१३)हा सण तालुक्यात सर्वत्र उत्साहात साजरा केला गेला. शहरासह ग्रामीण भागातून पारंपरिक धार्मिक पद्धतीने विधीवत पूजन करून होळी सण उत्साहात साजरा झाला.
शहरात अनेकांनी आपल्या घरासमोर होळी पेटवली तर गावा गावातुन मंदिरासमोर चौकातुन होळी सण साजरा केला. वेळवंड खो-याचे प्रवेशद्वार असणाऱ्या आदर्श गाव बसरापूर या ठिकाणीही होळी सण उत्साहात साजरा झाला यावेळी गावातील मानकरी दत्तात्रय झांजले, रामचंद्र झांजले, अर्जुन झांजले,विठ्ठल झांजले गावचे पाटील यांनी होळीचे विधिवत पूजन करून, होळीस नैवेद्य दाखवून, होळी पेटवली यावेळी गावातील बहुसंख्येने ग्रामस्थ, तरुण लहान मुले, जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी सण असुन वृक्षरूपी समिधा, माणसाच्या वाईट सवयी, वाईट विचार, द्वेष भावना, अनिष्ट रूढी चालीरीती परंपरा, अज्ञान या होळीच्या अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणे आणि सर्वांनी एकत्रित येऊन समाजात एकोपा निर्माण करणे हा उदात्त हेतू होळी साजरी करण्यामागे आहे असे जुन्या पिढीतील बुजुर्गांकडुन सांगण्यात आले आहे.