भोरः राजश्री शाहू विद्यामंदिर आंबेगाव बुद्रुक, पुणे महानगर पालिका अंतर्गत उपक्रमशील शिक्षक हर्षद चंद्रकांत बोबडे यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक २०२४ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. समाजाची नि:स्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्याच्यावतीने हा पुरस्कार दिला जातो.
हर्षद बोबडे यांनी आपल्या १२ वर्षे सेवेच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी राबविलेले उपक्रम, विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेत मिळविलेले सुयश, स्काऊट गाईड चळवळीत उल्लेखनीय कार्य आदी शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, शिक्षण मंत्री दीपक केसरजी, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे देण्यात येणार आहे. हर्षद बोबडे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल पुणे जिल्ह्यातून आणि त्यांच्या मूळ गावी राजापुर (ता.भोर) सर्वचस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
राजापुर गावचे सरपंच बाळासाहेब बोबडे यांनी याबद्दल अभिनंदन व्यक्त केले. राजापुर गावचे सुपुत्र हर्षद बोबडे सर यांना जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल राजापुर ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच भोर राजगड मुळशीचे युवा नेते कुलदीप तात्या कोंडे यांनी देखील दूरध्वनीद्वारे संपर्क साधून हर्षद बोबडे सरांचे अभिनंदन केले. पेंजळवाडी गावचे मा. सरपंच विकास चव्हाण,संदिप तात्या सोनवणे, यांनीही अभिनंदन केले.