भोर: राजगड (वेल्हा) तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी गुंजवणी, वाजेघर, वांगणी या पाणीपुरवठा योजनेमुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होत असून, मोठ्या प्रमाणावर शेतीचे क्षेत्र ओलीताखाली आले असल्याचे प्रतिपादन भोर विधानसभेचे आघाडीचे संग्राम थोपटे यांनी केले. वेल्हा राजगड तालुक्यातील गावांना भेटी देत त्यांनी नागरिकांची संवाद साधला.
त्याचबरोबर तालुक्यातील मुख्य असलेला चेलाडीपासून महाडला जोडला जाणार रस्त्या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, त्याची मंजुरी मिळताच सदर रस्त्याचे रुंदीकरण व संपूर्ण काँक्रिटीकरणाचे काम सुरू होणार असल्याची ग्वाही थोपटे यांनी यावेळी दिली.
(वेल्हा) तालुक्यातील आंबवणे, बोरावळे, निगडे, वांगणी, कोळवडी, कातवडी, मांगदरी, करंजावणे, आडवली, आस्कवडी, मार्गासानी, कोंढवली, वांजळे, खरीव, खोडद, ब्राह्मणघर, वेल्हा गावात त्यांनी भेट दिली. तसेच या भेटीदरम्यान नागरिकांची संवाद साधला. त्यांच्या या भेट दौऱ्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न पुढील काळात सोडवले जातील: थोपटे
धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित असणारे पुनर्वसन विभागातील काही प्रश्न सोडविण्यात यश आले असून काही प्रश्न आजही प्रलंबित आहेत. याबाबत पाठपुरावा सुरूच आहे, येणाऱ्या पुढील काळात महाविकास आघाडीचे सरकार राज्याचे येणार असल्याचे चित्र स्पष्ट असल्याने पुढील काळात ते ही प्रश्न नक्कीच सोडविले जातील, अशी ग्वाही थोपटे यांनी राजगड वासियांना दिली.
आपण आजवर केलेल्या सहकार्यामुळेच व दाखविलेल्या विश्वासाच्या जोरावर या भागातील पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पुरवठा योजना, स्थानिक आमदार निधी, डोंगरी विकास कार्यक्रम, साकव कार्यक्रम, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधी उपलब्ध करून गावागावात विविध विकासकामे करण्यात आली आहेत असे ते यावेळी म्हणाले.
प्रसंगी संतोष रेणुसे, नानासो राऊत, दिनकरराव धरपाळे, दिनकर अण्णा सरपाले, संभाजी मांगडे, संदीप नगीने, तानाजी मांगडे, शैलेश वालगुडे, अमोल पडवळ, प्रमोद लोहकरे, शिवराज शेंडकर, गणेश जागडे, मोहन गिरंजे, शिवाजी चोरघे, विशाल वालगुडे, प्रकाश बढे, हनुमंत कारले, आशा रेणुसे, छाया काळे, दुर्गा चोरगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.