वेल्हेः येथील भाजप कार्यकर्त्यांनी वेल्हे-नसरापूर (velhe-nasarapur road) रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हे निकृष्ट पद्धतीने होत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे काम थांबवले आहे. वेल्हे-नसरापूर या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. याबाबत वारंवार तालुक्यातील नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास दिल्यानंतर अखेर खड्डे बुजवण्याचा मुहूर्त सार्वजनिक बांधकाम विभागास मिळाला असून, खड्डा बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले.
भर पावसामध्ये डांबराच्या रस्त्यांवरती रेडी मिक्स काँक्रीटद्वारे खड्डे बुजवण्याचे काम सुरू होते. मात्र, पाऊस पडत असताना तसेच रेडी मिक्स काँक्रीट हे पातळ असल्याने रस्त्यांमधील खड्ड्यांमध्ये पाणी असताना त्याच्यामध्ये सिमेंट काँक्रेट टाकले जात होते. पुढे खड्डे बुजवण्याचे काम सुरू ठेवले जात होते, तर मागे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खड्ड्यातील काँक्रेटवरून वाहने गेल्याने ते काँक्रेट चिखलासारखे होत होते. दरम्यान, अनेक नागरिक, प्रवासी हे पाहत होते. परंतु, अधिकारी व ठेकेदार यांना बोलण्यास पुढे कोण येत नव्हते. यासंदर्भात भाजप कार्यकर्त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी माळेगाव या ठिकाणी येऊन अधिकारी व ठेकेदार याबाबात विचारणा केली. तसेच रस्त्याचे काम टिकणार आहे का? असा प्रश्न देखील विचारला.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष राजू रेणुसे, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अविनाश भोसले, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दिनकर मळेकर आदीसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता प्रकाश गाडे यांना चांगले धारेवर धरले व काम थांबवण्याच्या सूचना केल्या.
वेल्हे-नसरापूर रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्ट्या न काढणे, रस्त्यावरील पाणी निघण्यासाठी बाजूला गटारे न काढल्याने व अनेक पार्टी वाल्यांनी रस्त्याच्याकडेने शेतामध्ये जाताना पाणी जाण्यासाठी मोरी न टाकल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी चिखल येऊन कोट्यावधी रुपयांचा निधी व जनतेचा पैसा वाया जात असून, याला सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांबरोबरच लोकप्रतिनिधी व त्यांचे लाडके ठेकेदार जबाबदार आहेत.
राजू रेणुसे( भाजप युवा मोर्चा मा. अध्यक्ष)