भोरला माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची घेतली भेट, राजकीय घडामोडींना वेग
भोर -अजित पवार यांनी केलेला संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी होता तो कोणासाठी व्यक्तिगत नव्हता , अजित दादांनी गेली २५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी काम केले आहे, तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देऊन नवीन चेहरे विधान भवनात पाठवले आहेत.दादाचे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी कार्य मोठे आहे. विजय शिवतारेंबद्दल काही वाटत नाही मी काही बोलणार नाही, अजित पवारांनी मागील निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळण्यासाठी शिवतारेंबद्दल टिक्का टिप्पणी केली होती. एक दोन दिवसात पक्षश्रेष्ठी लोकसभेचे उमेदवार जाहीर होतील, बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडुन सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर होईल अशी ग्वाही देत आम्ही या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहोत असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज भोरमधील पत्रकार परिषदेत केले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरूवार (दि.२१) बारामती मतदारसंघातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे वडील माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या निवासस्थानी संगमनेर (ता.भोर) येथे सुनील तटकरे यांनी अचानक भेट देत पत्रकारांशी संवाद साधला. तटकरे यांच्या भेटीने या मतदारसंघातील राजकीय घडामोडी हालचालींना वेग आला असून नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. तटकरे म्हणाले अनंतराव थोपटे हे माझे मार्गदर्शक राहिलेले आहेत त्यांची तब्येतीची विचारपूस व आशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही ही एक सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी सांगितले. दोघांमध्ये बंद दाराआड काही मिनिटे चर्चा झाल्याने तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.