कुंदन झांजले, भोर
भोरः अनेक वर्षांपासून निष्पाप लोकांचा बळी घेणारा भोर-कापूरहोळ रस्त्याची पुन्हा एकदा दैयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या काँक्रीटीकरणास सहा महिन्यांपूर्वीच सुरुवात झाली. परंतु, ठेकेदाराच्या आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ऐन पावसाळ्यामध्ये रस्ता ठिकठिकाणी खचला आहे. यामुळे या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. यासाठी भोर भारतीय जनता पक्षाने अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम खाते भोर यांच्याकडे या रस्त्यासाठी पाठपुररावा करीत ही बाब निदर्शनास आणून दिली. मात्र, अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस राजाभाऊ गुरव यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम खाते भोर यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
भोर तालुक्यात कापूरहोळ ते वाई दरम्यान 40 किलोमीटर मार्गावर सूरू असलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात भाजप आक्रमक झाल्याचे यावेळी पाहिला मिळाले. या ठिय्या आंदोलनामध्ये, शेकडो कोटी रुपये खर्च करून रस्ता केल्यानंतर पहिल्या दोन महिन्यातच रस्ता काही ठिकाणी खचल्याने, तर काही ठिकाणी सिमेंटच्या रस्त्याला मोठ्या भेगा पडल्याने शहर भाजपच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. अनेक वेळा ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून देखील सदरचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने भाजप कार्यकर्त्यांचा भोरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्याच्या केबिनच्या दारात ठिय्या मांडत पदाधिकारी बसले होते. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कार्यालयात हजर नसल्याने त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी फोनवरून संपर्क केल्यानंतर, तुम्हाला कायं करायचंय ते करा असं उत्तर मिळाल्याने अधिकाऱ्यांच्या दालनासमोर कार्यकर्त्यांनी मांडला ठिय्या मांडला. यावेळी जोपर्यंत अधिकारी येत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी आक्रमक भूमिका आंदोलन कर्त्यांनी घेतली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला.
या आंदोलनासाठी शहराध्यक्ष सचिन कनेरकर, दत्तात्रय झांजले, संतोष लोहकरे, अमर ओसवाल, संजय खरमरे, बादशाह भाई शेख, सचिन चुनाडी, सुनील शेडगे, वैशाली बांदल, पल्लवी फडणीस, भाग्यश्री साठे, आयेशा नालबंद, पोर्णिमा धोंडे, क्षिति लाळे, दिनकर वाघमारे, रावसाहेब घोरपडे, ताराचंद सकट, भाऊसाहेब घोरपडे, आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.