दौंडः तालुक्यातील खामगावमध्ये वर्दळीच्या मुख्य चौकात आज सायंकाळी पाच वाचण्याच्या सुमारास सूरज भुजबळ नावाच्या युवकावर कोत्याने वार करुन त्याची निर्घून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली असून, या घटनेची माहिती यवत पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेत मयत पावलेल्या सूरजचे येथील मुख्य चौकात कपड्याचे दुकान आहे. सुरज नेहमीप्रमाणे दुकानांमध्ये बसलेला असताना अचानक दुकानामध्ये मारेकऱ्यांनी प्रवेश केला. सोबत आणलेल्या कोयत्याच्या साह्याने मारेकऱ्यांनी त्याच्या मानेवरती एकामागून एक सपासप वार केले. काही समजण्याच्या आतच सुरज धारातीर्थी पडला. या हल्ल्यात त्याचा दुर्देवी अंत झाला आहे.
या घटनेनंतर मारेकऱ्यांनी सदर घटनास्थळांवरून पळ काढला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ चौकामध्ये जमा झाले. या घटनेचे वृत्त यवत पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सुरजच्या आईने मारेकऱ्यांना हजर करा तरच मृतदेहाला हात लावा, अशी आक्रमक भूमिका घेतली. काही वेळानंतर जमावाला पांगवून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. मात्र, या घटनेमुळे येथे तणावाचे वातावरण तयार झाले आहे. या खूनच्या घटनेमुळे येथील नागरिक भयभीत झाले असून, खून नेमका कोणत्या कारणासाठी आणि कोणी केला, याचा तपास पोलीस करीत आहेत.