सासवडः येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाची रक्कम मिळवून देण्यासाठी पीएमआरडीमध्ये कंत्राटी कामकाज करणारे कनिष्ठ अभियंता, इंजिनीअर व एका व्यक्तीला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सदर कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंध विभागाने केली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी तेजस संपत तावरे (वय ३२ वर्ष, पद कनिष्ठ अभियंता (कंत्राटी) व हेमंत लालासो वांढेकर (वय २९, पद इंजिनिअर (कंत्राटी) दोघे पीएमआरडी कार्यालय, आकुर्डी, पिंपरी-चिंचवड, पुणे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच रामदास ऊर्फ बाबू मारुती कटके (वय ४८ वर्ष, रा. भिवरी, ता. पुरंदर) यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
सदरील अधिकारी हे पुरंदर पंचायत समितीच्या जुन्या इमारतीमधील कार्यालय कार्यरत आहेत. तक्रारदार यांनी त्यांच्या वडीलांच्या नावाने पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला होता. या योजनेतून तक्रारदार यांना घरकुलाचे दोन लाख पन्नास हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून, त्यापैकी पहिला हप्ता एक लाख तक्रारदार यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे. उर्वरित दीड लाख रुपये जमा करण्याचे असून, सदर रक्कम तक्रारदार यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी लोकसेवक हेमंत वांढेकर व खाजगी इसम रामदास कटके यांनी तक्रारदार यांच्याकडे पन्नास हजार रुपयाची लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे दाखल झाली होते. त्यानुसार सदर लाचेची रक्कम स्विकारताना आरोपींना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे हे करीत आहेत.