वाठार हिमा जि.प.शाळेचा अनोखा उपक्रम ”
भोर- “ वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ” या ओवीप्रमाणे झाडे, वृक्ष ,वेली ,पशू पक्षी हे मानवाचे सगेसोयरे आहेत. इतर प्राण्यांप्रमाणे झाडेही सजीव आहेत. पर्यावणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाठार हि.मा.( ता.भोर) येथे केंद्रप्रमुख अंजना वाडकर यांचे हस्ते झाडांचे पूजन करुन झाडांना राखी बांधून विद्यार्थी आणि शिक्षक यांनी पर्यावरणपुरक सामाजिक संदेश देत रक्षाबंधन सण साजरा केला.
भोर तालुक्यातील वाठार हि.मा.शाळेच्या आवारात एक पिंपरणीचा मोठा वृक्ष आहे. या वृक्षावर चिमणी ,कावळा, तांबट, बुलबुल, सुतार पक्षी , पोपट ,पारवा इ.पक्ष्यांची घरटी आहेत. अधूनमधून पंढरपूरी चिमण्या, भारद्वाज पक्षी तसेच निळया रंगाच्या ख॔ड्या पक्ष्याचेही दर्शन घडते. उन्हाळ्यात झाडावर छोटी छोटी फळे येतात. फळे खाण्यासाठी झाडावर पक्ष्यांची गर्दी होते. झाडावर पक्ष्यांचा चिवचिवाट तर शाळेत मुलांचा किलबिलाट सुरू असतो.
हा पिंपरण वृक्ष शाळेचाच एक अविभाज्य भाग बनलेला आहे. दररोज मुले सकाळी शाळेत आल्या बरोबर या झाडाच्या सावलीत अवतीभोवती खेळत असतात. दुपारच्या सुट्टीत झाडाखाली बसून पाढे पाठांतर करणे, कविता पाठांतर करणे पाठवाचन करणे, गाण्यांच्या भेंड्या खेळणे इ.मध्ये मुले रमून जातात.या पिंपरण वृक्षाच्या थंडगार सावलीमुळे कडक उन्हाचा त्रास जाणवत नाही.
त्याच्या ऋणातून मुक्त होणे शक्य नाही पण त्याच्याबरोबर
रक्षाबंधन सण साजरा करून विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला आहे.
याप्रसंगी उत्रौली केंद्राच्या केंद्रप्रमुख अंजना वाडकर, मुख्याध्यापक रमेश कुंभार, शिक्षक विठ्ठल आखाडे, निलीमा शिंदे केदारनाथ परमहंस आणि शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.