पसुरेत लाईट चालू करण्यासाठी पोलवर चढताना पाय घसरून घडला अपघात
भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पसुरे दिघेवस्ती या ठिकाणी लाईट दुरुस्ती करण्यासाठी गेलेल्या वायरमनचा वीजेच्या खांबावरून पाय घसरून अपघात घडल्याची घटना गुरुवार (दि.२५) दुपारी दीडच्या सुमारास घडली. सुदैवाने सदर वायरमन बचावला असुन शिवळ येथील जोगळेकर दवाखान्यात उपचार घेत आहे.
सध्या तालुक्यातील सर्वच भागात अतिवृष्टी होत आहे,पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने तालुक्यातील वेळवंड खोऱ्यात वीजेचा लपंडाव सुरू आहे. वरच्या भागातील अनेक गावातुन वीज म्हणजेच लाईट नाही. या भागातील पसुरे हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या गावातील दिघेवस्तीतील पोलवर लाईट दुरुस्ती करिता या भागातील वायरमन किरण बंडे हे चढले असता खाली उतरताना पोल पावसामुळे निसरडा,शेवाळयुक्त झाल्याने हात पाय घसरून पडुन जखमी झाले.त्यांना तात्काळ भोरच्या हरजीवन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु काही कारणास्तव त्यांना शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.त्यांच्या बरकडीला फ्रॅक्चर झाले असून त्यांची परिस्थिती सध्या ठिक असल्याचे महावितरणाचे अधिकारी एस एस साबळे यांनी सांगितले. यावेळी पसुरेतील विद्यमान सरपंच पंकज धुमाळ उपस्थित होते.यावेळी लाईन ओढण्याचे काम सुरू होते.पसुरेचे सरपंच पंकज धुमाळ यांनीही मदतीकरता आपली काही माणसे दिली होती असे त्यांनी सांगितले.
या भागात पावसाच्या अतिवृष्टीने व तांत्रिक अडचणींमुळे वीज वारंवार जात आहे.त्यामुळे नागरिकांची ओरड येत आहे. डोंगराळ , अतिदुर्गम भाग असल्याने या भागात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.त्यातच दोन, तीन कर्मचारी आणि अठ्ठावीस ते तीस गावे सांभाळताना कर्मचारी कोणा कोणाकडे लक्ष ठेवणार,त्यातच पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात, दुर्गम डोंगराळ भागात पावसात विद्युत खांबावर,डीपीवर फेज टाकणे ,जंप टाकणे,डिओ टाकणे ,कार्बन काढणे,मीटर लाईन टाकणे हि सर्व कामे अवघड होत आहेत असे या विभागाचे विद्युत अभियंता अधिकारी एस एस साबळे यांनी सांगितले