बारामती: माहिती अधिकार अधिनियम २००५ कायदा देशभरात २००५ या वर्षांपासून लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाणीवपूर्वक उचललेल्या पावलांमुळे अल्पावधीतच महाराष्ट्र राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरूपात लोकाभिमुख झाला आहे. तरी देखील नजीकच्या काळात अधिकारी वर्गाच्या उदासीनतेने आपल्या तालुक्यात दिनांक २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून लूप्त होत चालला असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे यांनी केले. तसेच बारामती तालुक्यात माहिती अधिकार अधिनियम कायद्याच्या व्यापक प्रसिद्धीकरिता व प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावर सर्वतोपरी उपाययोजना करण्यात याव्यात, शासन परिपत्रकानुसार दि. २८ सप्टेंबर रोजी बारामती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात यावा, असे निवेदन त्यांनी बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांना दिले आहे.
या दिवशी माहिती अधिकार कायद्यातील तरतुदी व कार्यपद्धतीबाबतची माहिती विविध माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देऊन व विविध उपक्रम राबवून बारामती तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत व शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवावी; तसेच तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा, महाविद्यालय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, इतर शैक्षणिक संस्थांमध्ये माहिती अधिकार विषयावर आधारित निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्र, व्याख्यानमाला कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे या निवेदनात म्हटले आहे.
चर्चासत्र व व्याख्यानमालाचे आयोजन करावे
सर्व शासकीय कार्यालयांत बारामती तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते व अशासकीय समाजसेवी संस्था, सामाजिक संस्था यांच्या मदतीने प्रत्येक कार्यालयातील माहिती अधिकार कायदा व अधिनियम २००५ चे प्रशिक्षण, चर्चासत्र, व्याख्यानमाला आयोजित करण्यात याव्येत. या सर्व मागण्यांसाठी उचित आदेश पारीत करावेत, असे देखील सांगण्यात आले आहे.