भोर-वेल्हा(राजगड)-मुळशीः विधानसभेच्या रणधुमाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. भोर विधानसभा क्षेत्रातून अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असले तरी, ही निवडणूक विद्यमान आमदार संग्राम थोपटे विरुद्ध शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांच्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माध्यमांमध्ये तिरंगी वा चौरंगी लढत या विधानसभा क्षेत्रात होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या विषयी राजगड न्यूजने काही जाणकरांची मते घेतल्यानंतर ही निवडणूक थोपटे विरुद्ध कोंडे अशीच होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. खरं पाहिले तर मागच्या निवडणुकीत अवघ्या काही मतांच्या फरकाने कोंडे पराभूत झाले होते. त्यामुळे भोर विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीकडून कुलदीप कोंडे आणि काँग्रेसकडून संग्राम थोपटे हे उमेदवार असल्यास निवडणूक रंगतदार होणार आहे.
संग्राम थोपटेंची ओळख
मा. मंत्री अनंतराव थोपटे यांनी ७० च्या दशकात भोर विधानसभेची निवडणूक लढवून ते विजयी झाले. सहा वेळा त्यांनी या क्षेत्राचे प्रतिनिधित्व विधानसभेत केले. त्यामुळे भोरच्या सर्वांगीन विकासामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा मानला जातो. त्या नंतरच्या काळात त्यांचे पुत्र आमदार संग्राम थोपटे यांनी देखील निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. त्यानंतर त्यांनी तीनदा या क्षेत्राचे प्रतिनिधित्व विधानसभेत केले आहे. थोडक्यात भोरच्या विकासामध्ये थोपटे परिवाराचा खूप मोठा वाटा आहे, असे जाणकार सांगतात. संग्राम थोपटे हे परखड बोलणारे तेवढचे संवदनशील व्यक्तीमहत्व आहे. नागरिकांमध्ये जावून त्यांच्याशी थेट संवाद ते साधतात. यामुळेच तीनदा त्यांना या भागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
कुलदीप कोंडे यांची ओळख
कुलदीप कोंडे हे खरंतर कट्टर शिवसैनिक मानले जातात. लोकांमध्ये मिळून मिसळून काम करणारा शेतकरी कुटुंबातील मुलगा असे त्यांची ओळख या भागात आहे. एका गावाचे उपसरपंच त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केलेले आहे. सध्याच्या घडीला ते शिवसेना शिंदे गटात आहेत. त्यांना महायुतीकडून तिकीट मिळण्याची शक्यता दिसत आहे. त्यांनी दोनदा विद्यामान आमदार संग्राम थोपटे यांच्या विरुद्ध भोर विधानसभेची निवडणूक लढविली आहे. फार थोड्या मतांच्या फरकाने त्यांच्या वाट्याला पराभव आला.
….म्हणून या दोन नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता
या सगळ्या गोष्टींचा विचार करिता महायुतीकडून कुलदीप कोंडे तर महाविकास आघाडीकडून संग्राम थोपटे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही नेत्यांचे प्राबल्य या भागात अधिक असल्याने जनाधार कोणाच्या पारड्यात पडतो हे पाहणे महत्वाचे आहे. मागच्या निवडणुकीत तर कोंडे यांचा थोड्या मतांच्या फरकाने निसटता पराभव झाला.
‘त्या’ भेटीमुळे राजकीय समीकरणे बदलली
लोकसभेच्या निवडणुकीत पवारांनी थोपटे परिवाराची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर थोपटे परिवार पवार यांच्या बरोबर असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाले. बारामती लोकसभेसाठी उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांनी चौथ्यांदा निवडणूक लढवली. तब्बल १ लाख मतांच्या लीडने त्या विजयी झाले. या भागातून त्यांना ४३, ८०५ एवढी मते मिळाली. ही मते मिळण्याचे मुख्य कारण होते विद्यमान आमदार संग्राम थोपटे. त्यांनी नागरिकांना सुळेंच्या कामांचे आणि पवारांना साथ देण्याचे आवाहन केले. त्यामुळेच सुळेंना इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान या भागातून झाले होते.
संग्राम थोपटेंसाठी यंदाची निवडणूक सोपी?
लोकसभेला संग्राम थोपटेंनी सुप्रिया सुळेंना निवडूण आणण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. मागच्या दोन निवडणुकीत थोपटेंना कोंडेशी सामना करावा लागला. तसेच थोपटे विजयी झाले असले तरी त्यांचे मताधिक्य घटले असल्याची चर्चा केली जात आहे. मात्र, यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी फारशी अवघड जाणार नसल्याचे जाणकार सांगतात. लोकसभेला जशी शरद पवार यांना सहानभूती मिळाली. तशीच थोपटेंला देखील मिळू शकते.
२०१४, २०१९, २०२४ ?
२०१४
२०१४ च्या निवडणुकीत देशात आणि राज्यात भाजप आणि मोदींचा करिष्मा चालला असला तरी, या भागात मात्र संग्राम थोपटे यांनी विजय आपल्या केला. त्यावेळी कुलदीप कोंडे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाल्याने शरद ढमाले यांनी शिवसेनेतून भाजपात प्रवेश करून उमेदवारी घेतली. त्या वेळी एकूण 3,18,160 मतदारांपैकी 2,18,602 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. आमदार संग्राम थोपटे काँग्रेस 78602 (35.96 टक्के), कुलदीप कोंडे शिवसेना 59,651 (27.29 टक्के), विक्रम खुटवड राष्ट्रवादी 50,165 (22.95 टक्के) मते मिळाली. तिरंगी लढतीत संग्राम थोपटे हे 18951 इतक्या मतांनी विजय मिळवून दुसर्यांदा आमदार झाले.
२०१९
कोंडे आणि थोपटे यांच्यात दुसऱ्यांदा अटीतटीच्या लढत झाली. त्यावेळी एकूण 3,61,764 मतदारांपैकी 2.28.264 मतदारांनी मतदान केले. आमदार थोपटे यांना 108925 मतदान झाले, तर कोंडे यांना 99716 मतदान झाले. ही लढत अत्यंत चुरशीची झाली होती. अवघ्या 9206 मतांनी आमदार थोपटे विजय झाले होते.
२०२४ ?
पुन्हा एकदा थोपटे विरुद्ध कोंडे अशी लढत झाल्यास कोंडेसाठी ही तिसरी संधी असणार असून, थोपटेंना विजय मिळविण्याची चौथी संधी असणार आहे. या निवडणुकीत मतदारांची संख्या आणखी वाढली असणार आहे. त्यामुळे गेल्या दोन निवडणुकीपैक्षा ही निवडणूक अटीतटीची मानली जात आहे. यामुळे मतदार राजा काय भूमिका घेतो यावर इथली निवडणूकीची गणितं अवलंबून असणार आहे.
विजयाचा गुलाल कोण माथी लावणार?
निवडणुकीची तारीख केव्हाही निवडणूक आयोग घोषित करू शक्यतो. येथील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. सभा, जत्रा, यात्रा, विकास कामे, भूमिपूजन, गावभैट दौरा आदी गोष्टींवर भर नेते मंडळी देताना दिसत आहे. दोन्ही बांजूंकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडताना दिसत आहेत. आता आचारसंहिता लागून निवडणुकीत येथील जनाधार कोणाच्या पारड्यात पडून विजयाचा गुलाल कपाळला लावतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.