बारामतीः राज्यात होत असलेल्या मुली व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे पंचशक्ती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी दिली. या अभियानाच्या माध्यमातून शक्ती बॉक्स, शक्ती नंबर, शक्ती भेट, शक्ती कक्ष आणि शक्ती नजर हे उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलींना आपल्या तक्रारी सांगता येणार आहेत. शिवाय पोलिसांना देखील तात्काळ कारवाई करायची असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. या पंचशक्ती अभियानाच्या सूचनांची अमंलबजावणी करण्यासाठी पोलिसांना अजित पवारांनी सांगितले आहे.
काय आहेत ही पंचशक्ती
१. शक्ती बॉक्स
बारामती शहरातल्या एसटी स्टँड, कोचिंग सेंटर, शाळा, महाविद्यालय या ठिकाणी शक्ती बॅाक्स लावण्यात येणार आहे. ही एक तक्रार पेटी असणार आहे. या माध्यमातून मुलींना आपल्या तक्रारी या तक्रार पेटीत टाकता येणार आहेत. तक्रार केली आहे त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
२. महिलांसाठी शक्ती नंबर
9209394917 या शक्ती नंबरवर आपत्तीवेळी संपर्क करायचा आहे. या क्रमांकाची सेवा 24/7 सुरू असणार आहे. तक्रार केल्यानंतर तातडीने कारवाई केली जाणार आहे. ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत असेल, अशा वेळी या क्रमांकावर तातडीने संपर्क करता येईल. यामुळे तात्काळ मदत मिळणे शक्य होणार आहे.
३. शक्ती नजर
तरुण आणि तरुणींंमध्ये सोशल मीडियावर वावरण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ते सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने करत आहेत, त्यावर शक्ती नजर असणार आहे. या माध्यमातून फेसबुकवर केल्या जाणाऱ्या पोस्ट, इंस्टाग्राम, व्हाट्सअप स्टेटस यावर लक्ष ठेवले जाणार आहे.
४. शक्ती भेट
शक्ती भेट या माध्यमातून शाळा, कॉलेज, सर्व शासकीय कार्यालय, खाजगी कंपन्या, रुग्णालय, एसटी स्टँड, कोचिंग क्लासेस, क्लासेस, महिला होस्टेल या ठिकाणी भेटी दिल्या जाणार आहेत. तिथे असलेल्या महिला मुलींना महिलांचे कायदे, गुड टच, बॅड टच, याबद्दल मार्गदर्शन शिबीरे घेण्यात येणार आहेत.
५. शक्ती कक्ष
बारामती पोलीस उपविभागीय कार्यालय आणि पोलीस स्थानकात शक्ती कक्ष उघडले जाणार आहेत. तिथे महिलांच्या मदतीसाठी महिला पोलीस कार्यरत असणार आहेत. शिवाय कायद्याचेही ज्ञान या कक्षाच्या माध्यमातून दिले जाणार आहे. किशोरवयीन मुले -मुलींना गुन्हेगारी व व्यसनांपासून दूर ठेवण्याचे काम देखील केले जाणार आहे.