पुणेः पुणे जिल्ह्यात येणारे पुरंदर, भोर आणि शिरुर यात तीन विधानसभा मतदार संघामध्ये जिल्हा नियोजन समितीने निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप करीत राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. भोर, पुरंदर, शिरुर या तीनही मतदारसंघांना कुठल्याही प्रकारे आमदारांनी सुचवलेल्या कामाचा एकही रुपयाचा निधी दिला नसल्याचे यावेळी बोलताना भोरचे आमदार संग्राम थोपटे म्हणाले.
तसेच जिल्हा नियोजन समितीमध्ये आम्ही सर्वजण निमंत्रित सदस्य म्हणून काम करतो. यापूर्वी देखील वेळोवेळी कामाच्या स्वरूपात सूचना मागितल्या, त्या सूचना मी आजपर्यंत त्यांना दिलेल्या आहेत. पूर्वीच्या काळात विविध पत्राच्या रूपाने मागण्या केल्या. परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा दुजाभाव न करता निकषाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासाला निधी उपलब्ध करून दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
परंतु आता लोकशाहीमध्ये एकाधिकारशाही येत आहे, हम करे सो कायदा, मी म्हणेल तेच खरं! अशा पद्धतीची प्रवृत्ती राजकारणामध्ये बळावत असल्याचे टिकास्त्र आमदार थोपटे यांनी सरकारवर डागले आहे. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे, पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय जगताप, शिरूर हवेली मतदारसंघाचे आमदार अशोक पवार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे नाव न घेता टीका
पालकमंत्र्यांनी दुजाभाव करणे गरजेचे नाही, एका अर्थाने विकासाला खोडा घालण्याचे काम केले जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्या मतदारसंघाने त्यांना मताधिक्य दिले नाही, असा सवाला थोपटे यांनी उपस्थित केला. तसेच राजकीय उद्देश ठेवून निधी वाटप केला जात असेल, तर त्याचा आम्ही निषेध करतो. असे देखील ते यावेळी म्हणाले.
डोंगरी भागासाठी निधी मागितला आहेः आमदार संग्राम थोपटे
जिल्हाधिकारी या समितीचे सचिव आहेत, या नात्याने आपल्या माध्यमातून जो या दुर्गम आणि डोंगरी भागातील विकासाचा निधी मागितला आहे, तो उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी थोपटे यांनी केली आहे.
जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही
तुम्हाला कोणत्या मतदारसंघात किती मताधिक्य दिले त्याद्वारे जर निधी वाटप करत असाल तर जनता नक्कीच तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे थोपटे यावेळी म्हणाले.