पुणे: अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना कर्वेनगर येथील श्रीराम सोसायटीत मध्यरात्री एकच्या सुमारास घडली आहे. राहुल पंढरीनाथ निवंगुणे (वय ४२) असे खून झालेल्याचे नाव आहे. धारधार शस्त्राने त्यांच्यावर वार करुन खून करण्यात आला आहे. राहुल हे एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत होते. त्यांना तीन मुली आहेत.
वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास निवंगुणे यांच्या घराचा दरवाजा अज्ञात व्यक्तींनी वाजविला. निवंगुणे यांनी घराचे दार उघडले. त्याच वेळी बाहेर उभ्या असलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यास सुरुवात केली. यावेळी राहुल यांनी आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्यांच्या तीन मुली आणि पत्नी जागी झाली. आरोपींनी घरातील दागिने आणि रोख रक्कम लुट केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. यावेळी आरोपींच्या तोंडावर कापड बांधलेले होते. मुलींच्या देखत वडिलांची निर्घूणपणे हत्या झाल्याने मुलींच्या मनावर मोठा आघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘त्या’ एका संशयाने हत्याचा कट रचणाऱ्याचा लागला छडा
या प्रकरणाचा तपास करीत असताना पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पत्नीकडे कसून चौकशीला सुरुवात केली. अखेर पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जात खुनाचा छडा लावत पत्नीनेच प्रियकराच्या साथीने पतीचा खून घडवल्याची माहिती समोर आली. पतीला तिचे अनैतिक संबंध समजले होते. या अनैतिक संबंधात पती अडथळा ठरत असल्याने पतीचा काटा काढण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.