शिक्रापूर: शेरखान शेख
रांजणगाव गणपती येथून एका युवकाची पिस्तुलाचा धाक धाकवून अपहरण करण्यात आले होते. तसेच या युवकास मारहाण करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, तब्बल ७ महिन्यांनी फरार आरोपी प्रवीण वाळके याला पोलिसांनी अटक केली आहे.
पिस्तुलाचा धाक दाखवून केले होते अपहरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव गणपती येथील अजित ढेरंगे या युवकाला १४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रवीण वाळके सह एक महिला आणि त्याच्या साथीदारांनी चर्चा करण्यासाठी बोलावून पिस्तुलाच्या धाक धाकवून कारमध्ये बसवून दोरीने बांधून निर्जनस्थळी नेण्यात आले होते. त्या ठिकाणी या युवकास पिस्तुलाचा धाक दाखवून, कोयत्याने वार करुन लाकडी दांडक्याने मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेत अजित ढेरंगे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले होते.
याबाबत अजित हनुमंत ढेरंगे (वय २३ वर्षे रा. कुरुंद ता. पारनेर जि. अहमदनगर) याने दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी प्रवीण वाळके (रा. बाभूळसर), समीर उर्फ सोन्या तीरखुंडे, सागर तीरखुंडे, सुजाता संजय भोंडवे सर्व (रा. भांबर्डे पुणे, हर्षद गोसावी (रा. बाबुरावनगर जि. पुणे व जासूद ( पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सापळा रचून केली अटक
या प्रकरणात पोलिसांनी समीर उर्फ सोन्या तीरखुंडे, सागर तीरखुंडे, सुजाता संजय भोंडवे यांसह एका युवकाला अटक केली होती. मात्र प्रवीण वाळके व हर्षद गोसावी फरार झालेले असताना नुकतेच प्रवीण वाळके निमगाव भोगी परिसरात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे व उमेश कुतवळ यांना मिळाली. त्यांनुसार पोलिसांनी सापळा रचून प्रवीन वाळके (वय २१ वर्षे रा. बाभूळसर खुर्द ता. शिरुर जि. पुणे) याला अटक केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे हे करत आहे.